विचारवंतांच्या सुरक्षेचा पोलिसांकडून आढावा

विचारवंतांच्या सुरक्षेचा पोलिसांकडून आढावा

हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, निखिल वागळे मेघा पानसरे, कुमार केतकर यांच्या सुरक्षेचा आढावा पोलिसांकडून घेतला जात आहे.

ज्येष्ठ विचारवंत आणि अंधश्रद्धा निमूर्र्लन समितीचे सर्वेसर्वा नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या सचिन अंदुरे आणि त्याच्या साथीदारांकडून राज्यातल्या मान्यवर विचारवंतांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेतला जात असल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व मेघा पानसरे यांच्या नावाचा उल्लेख कर्नाटक पोलिसांना आढळला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या तिघांनाही ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

सीबीआयने यासंबंधीची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिल्यावर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यानंतर विचारवंतांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना त्या त्या पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. पुढे आलेल्या नावांमध्ये दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद, कन्या मुक्ता तसेच मेघा पानसरे यांच्याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यासह निखिल वागळे यांच्याही जीवाला धोका असल्याचे उघड झाले आहे. या माहितीनंतर केतकर, वागळे यांच्यासह काही विचारवंतांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे विचारवंत राहत असलेल्या निवासस्थानी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्या त्या पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. त्या विचारवंतांना शस्त्रधारी पोलीस शासकीय खर्चाने देण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, कुमार केतकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याच्या वृत्ताला काँग्रेसकडून दुजोरा देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील काही विचारवंत तसेच पुरोगामी चळवळीतील महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. केतकर हे संसदेचे सदस्य आणि जेष्ठ पत्रकार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सचिनचे फेसबुक बंद

दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या सचिन अंदुरे याचे फेसबुक अकाऊंट कालपासून बंद करण्यात आले आहे. सचिन या फेसबुकवर स्फोटक वक्तव्ये पोस्ट करीत होता. कट्टर हिंदुत्वाच्या समर्थनार्थ तो सतत लिखाण करायचा. सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करणारे राजकीय नेते आणि पत्रकारांविरोधी तो आपल्या लिखाणात गरळ ओकत असे. त्याचे फेसबुक अकाऊंट रविवारी पहाटे दोनपर्यंत दिसत होते. नंतर ते बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

First Published on: August 20, 2018 12:00 AM
Exit mobile version