पोलीस पूत्रानेच केली पोलिसांना मारहाण

पोलीस पूत्रानेच केली पोलिसांना मारहाण

पोलिसाची मारहाण (प्रातिनिधिक चित्र)

कल्याण : भररस्त्यात एका तरुणीला मारहाण करणार्‍या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकार्‍याला एका तरुणाने मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री कल्याण पश्चिम येथे घडला. या तरुणाच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी झाले असून त्यांचा गणवेषदेखील फाटला. अटक करण्यात आलेला तरुण हा मुंबई पोलीस दलातील एका अधिकार्‍याचा मुलगा असून त्याने पोलिसांना वडिलांच्या नावाने देखील धमकी दिली होती. अभिजित शिंदे (२७) असे या अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी पुत्राचे नाव आहे.

बदलापूर या ठिकाणी राहणारा अभिजित हा बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकाजवळ एका तरुणीला लथाबुक्यांनी मारहाण करत होता. हा प्रकार बघून पानटपरी चालक लोबो नावाच्या इसमाने वाहतूक कोंडी सोडवणारे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब यांना सांगितले. पोलीस अधिकारी खातीब यांनी हॉटेल दीपकजवळ धाव घेऊन त्या तरुणांच्या तावडीतून तरुणीची सुटका करण्याचा प्रयत्न केला.

परंतू या तरुणाने थेट पोलीस अधिकारी खातीब यांना धमकी दिली. ‘माझे वडील पोलीस अधिकारी आहेत, तुमच्या खांद्यावर जेवढे स्टार नाहीत, त्यापेक्षा माझ्या वडिलांच्या खांद्यावर स्टार आहेत’. ‘तुम्ही मला हात लावू नका, ती माझी मैत्रिण आहे, मी तिला काही करेल, तुम्ही मध्ये पडू नका’, या प्रकारची धमकी खातीब यांना दिली. पोलीस अधिकारी खातीब यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, उलट त्याने खातीब यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोळ्यावर आणि तोंडावर ठोसे मारले व त्यांची कॉलर पकडून ओढून त्यांना जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात खातीब यांचा गणवेष फाटला, अखेर खातीब यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी या पोलीस पुत्राला आवरले व त्याला पोलीस गाडीत कोंबून थेट महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आणले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अभिजित शिंदे असल्याचे सांगून तो बदलापूर येथे राहणारा आहे. त्याचे वडिल मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक या पदावर आहेत अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. महात्मा फुले पोलिसांनी पोलीस पुत्र अभिजित याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, तसेच धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी दिली. हा प्रकार झाला त्या वेळी तो नशेत असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

First Published on: October 19, 2018 4:27 AM
Exit mobile version