खेरवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

खेरवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

प्रातिनिधिक फोटो

खेरवाडी पोलीस ठाण्याच्या शाम हरी आयरे या पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेतल्यानंतर लाचेचा चाळीस हजार रुपयांचा दुसरा हप्ता घेताना शाम आयरे यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. गेल्या सात दिवसांत तीन पोलीस अधिकार्‍यांवर लाचप्रकरणी कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार एका भजनी मंडळातील सदस्य असून याच मंडळातील एका महिलेने त्यांच्याविरुद्ध खेरवाडी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रार अर्जाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे यांच्याकडे होता. हा तपास हाती येताच त्यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलाविले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांना या गुन्ह्यात बाहेर काढण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. घाबरुन तक्रारदाराने त्यांना दहा हजार रुपये दिले होते.

घाबरवून घेतली लाच
उर्वरित चाळीत हजार रुपयांसाठी आयरे त्यांना सतत फोन करत होते. त्यामुळे त्यांनी चाळीस हजार रुपये देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शाम आयरे यांना लाचेची ही रक्कम घेताना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी शाम आयरे यांनी तक्रारदारांना उद्देशून ती महिला आता तुमच्याकडे पन्नास लाख, एक कोटी रुपये मागणार होती. त्यापेक्षा इथे पोलीस स्टेशनला दहा, वीस लाख रुपये दिलेले काय वाईट आहे असे बोलून ही लाच घेतली होती.

एका आठवड्यातील तिसरी घटना
या आठवड्यातील पोलीस अधिकार्‍याला लाच घेताना अटक झाल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी गोवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक हरिभाऊ खरात यांना पोलिसांनी 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोवर देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी यांना मंगळवारी ऐंशी हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यानंतर आता शाम आयरे यांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

पोलीस दलात खळबळ
गेल्या सात दिवसांत तीन पोलीस अधिकार्‍यांना लाचप्रकरणी अटक केल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलिसांना अशा आमिषाला बळी पडू नका, कर्तव्यापासून कसूर करु नका असा दम देताना तसे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश दिले आहे.

First Published on: February 16, 2019 4:09 AM
Exit mobile version