विरोधकांनी मेट्रो प्रकल्पावरून राजकारण करू नये – एकनाथ शिंदे

विरोधकांनी मेट्रो प्रकल्पावरून राजकारण करू नये – एकनाथ शिंदे

सरकार कांजुरमार्ग मेट्रो कारशेडसाठी आणखी पर्यायाचा विचार करत आहे. मेट्रोच्या चार प्रकल्पांमुळे हा मेट्रोचा हब बनू शकतो. त्यामुळेच लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोचा मार्ग हा सुलभ असणार आहे, त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये असे आवाहन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कांजुरमार्गच्या निमित्ताने मेट्रोचा हब बनू शकतो. पण आता कांजुरमार्ग कारशेडच्या निमित्ताने ही जागा नेमकी कोणाची यासाठीचा न्यायालयीन वाद सुरू झाला आहे. सध्या उच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी स्थगिती दिल्याने या कारशेडचे काम स्थगित झाले आहे.

मेट्रो कारशेडच्या जागेसाठी सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरीही अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कांजुरमार्गच्या जागेला चांगल्या पर्यायाचा शोध आम्ही घेत आहोत. त्यामध्ये बीकेसी सारखे अनेक पर्याय आम्ही शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत मेट्रोचे कारशेड होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो कारशेडच्या निमित्ताने विरोधकांनी राजकारण करू नका असेही त्यांनी सांगितले. कांजुरमार्ग कारशेड मेट्रो प्रकल्पाच्या जागेवरच याआधीच्या सरकारने एक समिती नेमत याठिकाणी परवडणाऱ्या घरातील घरांच्या योजनेसाठीची तयारी केली होती. त्यामुळे या प्रकरणात विरोधकांनी राजकारण आणू नका असेही त्यांनी सांगितले.

First Published on: December 23, 2020 3:48 PM
Exit mobile version