व्वा रे लोकप्रतिनिधी! तुंबलेल्या मुंबईचंही राजकारण!

व्वा रे लोकप्रतिनिधी! तुंबलेल्या मुंबईचंही राजकारण!

विश्वनाथ महाडेश्वर,महापौर

मध्यरात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाने मुंबईत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुंबईच्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याच परिस्थितीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यासंदर्भात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदा पालिकेनं केलेल्या कामामुळे कुठेच पाणी तुंबले नसल्याचा अजब दावा केला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. अशामध्ये शहर तुंबलंच नाही, असा हास्यास्पद दावा मुंबईच्या महापौरांनी केला आहे.

पालिकेचं काम चांगलं – महापौर

कालपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. पाऊस थांबतो की नाही, असं वाटत होतं. ‘काही ठिकाणी पाणी साचले मात्र तुंबलेले नाही’ असं महपौरांनी सांगितलं आहे. तर पालिकेनं चांगलं काम केल्यांमुळं कुठेही पाणी साचलं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महापौरांच्या या वक्तव्याबाबत शिवसेना आमदार अनिल परब यांना विचारले असता ‘मी महापौरांचे वक्तव्य ऐकलेलं नाही’ असं त्यांनी सांगितलं. ‘कदाचित त्यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा असेल, महापौरांचा जन्म मुंबईचा आहे. त्यामुळं त्यांना मुंबईची जाण असल्याचं’ सांगत बाजू सावरण्याचा देखील प्रयत्न केला.

करुन दाखवलं म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ – शेलार

दरम्यान, नेहमीच शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजपानंदेखील आयती संधी साधत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असं म्हणत शिवसेनेवर जोरदार टीका केली. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. त्यामुळं मतदार शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असं म्हणत ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी पावसानंतर ‘पळून दाखवलं’ अशी टीका केली.

First Published on: June 25, 2018 4:56 PM
Exit mobile version