क्वारंटाईन सेंटर झालेत भ्रष्टाचाराचे कुरण; लोकांना मिळतंय शिळं अन्न

क्वारंटाईन सेंटर झालेत भ्रष्टाचाराचे कुरण; लोकांना मिळतंय शिळं अन्न

गोरेगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील दुरवस्था

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तिंना किंवा शेजारच्यांना क्वारंटाईन केले जाते. विषाणूचा प्रसार अधिक होऊ नये, तसेच संशयित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत या हेतून ही क्वारंटाईन सेंटरची सुविधा सुरु करण्यात आली होती. मात्र आपल्याकडे लोकांच्या जीवाशी खेळण्याची पद्धत कोरोना लढ्यात देखील शाबूत आहे की काय? असा शंका येते. कारण मुंबईतील अनेक क्वारंटाईन सेंटरमध्ये साधी स्वच्छता राखली जात नाही, संशयित रुग्णांना स्वच्छ पाणी, अन्न आणि कोणतेही वैद्यकिय उपचार मिळत नसल्याची बाब आता समोर येत आहे.

आपलं महानगरच्या एका वाचकाने सध्या गोरेगाव येथील मिठानगर शाळेतील दुरवस्था आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिली आहे. “सध्या मुंबईतील महानगरपालिकेच्या अनेक शाळा आणि खासगी शाळा क्वारंटाईन सेंटरसाठी शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. अनेकांना तिथे चौदा दिवस विलगीकरण करण्यात येते. बऱ्याच शाळेत स्नानगृह आणि शौचालये स्वच्छ नाहीत. लोकांसाठी येणारे रोजचे अन्नही पचपचित, चवहीन असते, कधी कधी अक्षरशः शिळ्या चपात्या देण्यात येतात. तर कधी कधी बिस्लरी बॉटल उपलब्ध नसल्याचे कारण सांगून पाणी देण्यात येत नाही. तक्रार केल्यानंतर कंत्राटदार काहीही कारण सांगून वेळ मारून नेतो आणि मग शेवटी तुम्हीच तुमची व्यवस्था करा असे सांगतो”, अशी व्यथा या वाचकांनी सांगितली.

“क्वारंटाईन सेंटर एकप्रकारे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. जर इतकी अस्वच्छता आणि शिळे अन्न दिले जात असेल तर लोक कोरोनातून मुक्त होण्याऐवजी आणखी आजारी पडतील. आधीच दडपणाखाली असलेल्या लोकांचे काही वाईट झाले तर याची जबाबदारी कोणाची? संबंधित कंत्राटदार किंवा मुंबई महानगरपालिका जबाबदारी घेणार का? असा सवालही येथील लोकांनी उपस्थित केला आहे. तेव्हा संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सर्व असुविधेकडे लक्ष देऊन ताबडतोब योग्य ती कारवाई करायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

First Published on: June 2, 2020 11:19 PM
Exit mobile version