“हे नाणं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या फोटूनं”: महामानवाला चित्रकाराकडून अनोखं अभिवादन…

“हे नाणं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या फोटूनं”: महामानवाला चित्रकाराकडून अनोखं अभिवादन…

मुंबईतल्या चेंबुरमधल्या लाल डोंगर परिसरात राहणाऱ्या प्रकाश बबन शिंदे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चित्रकलेच्या माध्यमातून अभिवादन केलंय.

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन करत आहेत. दादरच्या चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मुंबईतील एका तरूण चित्रकाराने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलंय.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, दिन दुबळ्यांचे कैवारी, अर्थतज्ञ, कामगार नेते, प्रकांड पंडित अशा अनेक रूपातील डॉ. बाबासाहेब सर्वांना परिचित आहेत. यासोबत बाबासाहेबांना संगीत आणि चित्रकलेची देखील आवड होती. बाबासाहेबांनी डोळे उघडे असलेले बुद्धांचे चित्र साकारले होते. त्यांनी रंग, रेषा,आकाराने नुसते चित्र नव्हे तर अनेकांच्या आयुष्यात देखील रंग भरले आहेत. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दरवर्षी कलेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प युवा चित्रकार प्रकाश बबन शिंदे याने केलाय. कलावंत व त्याच्या छंदाला धर्म, जातपात अशा बाबींचे बंधन नसते. झपाटलेपणातूनच इतिहास घडतो, हे वास्तव सत्य असल्याची प्रचिती प्रकाश बबन शिंदे या अवलियाकडे बघून येते. युवा चित्रकार प्रकाश बबन शिंदे या तरूणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना दिलीय. त्याच्या या उपक्रमाचे परिसरातील आबालवृद्ध जाणकारांकडून कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे प्रकाश शिंदे या तरूणाने चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. तरीही पहिल्याच नजरेत मनावर छाप सोडून जाईल अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चित्रकृती या युवा चित्रकाराने रेखाटली आहे. मुंबईतल्या चेंबूर इथल्या लाल डोंगर परिसरात राहणाऱ्या प्रकाश बबन शिंदेची घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रतिकूल, पण शाळेत नोकरी करणारी त्याची आई कुसूम बबन शिंदे यांनी त्याचा चित्रकलेचा छंद चांगलाच जोपासला. आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील प्रकाशच्या आईंनी त्याच्या कलासाधनेत कधी कुठलीही कमतरता पडू दिली नाही. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर फावल्या वेळेत हा तरूण वेगवेगळी चित्रे काढत होता. चित्रकलेचा डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स केलेल्या चित्रकारांना देखील लाजवेल असं यश प्रकाश बबन शिंदे या युवा चित्रकाराने आपल्या पदार्पणातच मिळवलं आहे.

प्रकाश बबन शिंदेची घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रतिकूल, पण शाळेत नोकरी करणारी त्याची आई कुसूम बबन शिंदे यांनी त्याचा चित्रकलेचा छंद चांगलाच जोपासला.

हे ही वाचा: आजच्या भीम जयंतीदिनी मोबाइलवरून पाहता येणार डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा तारा

सुरुवातीला फोटोवरून स्केचेस करणारा प्रकाश आता व्यवसायिक चित्रे रेखाटू लागला आहे. ते देखील कुणाचंही मार्गदर्शन नसतांना केवळ इतरांच्या चित्रकलेच्या शैली पाहून तो आपल्या कामात सुधारणा करत गेला. प्रकाशच्या या कलासाधनेचं कौतुक तर आहेच पण त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं ते त्याच्या खंबीरपणाचं, कारण नशिबाने दिलेली घरची गरीब परिस्थिती आणि त्यावर मात करून तो सतत चित्रकलेची साधना अविरतपणे करतोच आहे. आजवर त्याने वेगवेगळ्या महापुरूषांची चित्रे रेखाटली असून पुढे आपण याच क्षेत्रात राहायचं आणि कलाकार म्हणूनच जगायचं असा निश्चय त्यानं केला.

First Published on: April 14, 2023 4:47 PM
Exit mobile version