Coronavirus: स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबाला पोस्टाचा हातभार

Coronavirus: स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबाला पोस्टाचा हातभार

टपाल खाते आणि सर्वसामान्य यांचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. हे नाते टपाल खात्याकडून नेहमीच जपण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्येही टपाल खात्याने आपले हे नाते कायम ठेवत मुंबईमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबियांना पैसे पोहोचवत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनमुले गावी पैसे पाठवणे शक्य नसल्याने आपले कुटुंब काय खात असेल या विचाराने कामगारांना जेवणही गोड लागत नव्हते. कामगारांची ही चिंता लक्षात घेऊन टपाल खात्याचे मुंबई कार्यालय त्यांच्या मदतीला धावून आले आहे. आतापर्यंत टपाल खात्याने १५० स्थलांतरित कामगारांचे आयपीपीबी खात्यामार्फत त्यांचे पैसे थेट कुटुंबापर्यंत पोहोचवत त्यांना दिलासा दिला आहे.  

मुंबईमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून सर्वाधिक स्थलांतरित कामगार मुंबईमध्ये कामानिमित्त आले आहेत. हे कामगार वर्षभर काम करून गावाला जाताना आपल्यासोबत मुंबईमध्ये कमावलेले पैसे घरी घेऊन जातात किंवा गावाकडे कोणी जात असेल तर त्याच्याकडे पाठवून देतात. परंतु कोरोनामुळे देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कारभार ठप्प झाले आहे. रेल्वे बंद असल्याने हे कामगारही मुंबईमध्ये अडकून पडले आहेत. काम नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अडकलेल्या स्थलांतरित कामगारांच्या जेवणाची  व्यवस्था सरकार व सामाजिक संस्थाकडून करण्यात आली असली तरी गावाकडील आपले कुटुंब काय खात असेल या विचाराने त्यांचे मन व्याकुळ झाले आहे. या कामगारांनी पाठवलेल्या पैशावरच त्यांचे गावाकडील कुटुंब चालते. लॉकडाऊनदरम्यान गावाकडे कोणीही व्यक्ती जाऊ शकत नसल्याने पैसे पाठवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गावाकडे असलेले आपले आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, बहीण, हे कसे पोट भरत असतील,असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अशा या अवघड परिस्थितीमध्ये या कामगारांच्या मदतीला भारतीय टपाल खाते धावून आले आहे.

मुंबईत असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील कामगारांनी साठवलेले पैसे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचवण्याची जबाबदारी टपाल खात्याने उचलत आतापर्यंत मुंबईतून तब्बल १५० कामगारांचे पैसे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवल्याची माहिती पोस्टमास्तर जनरल स्वाती पांड्ये यांनी दिली. भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने स्थलांतरित कामगारांचे इंडियन पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) खाते उघडले आहे. या खात्यातून टपाल खात्याने स्थलांतरित कामगारांचे पैसे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवले आहेत. यातून टपाल खात्याने अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या सुखदु:खात असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवले आहे. 

एकीकडे स्थलांतरित कामगारांचे पैसे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवत असताना त्या कामगाराच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थाही टपाल खात्याकडून करण्यात आली आहे. मुंबईतील दोन हजार स्थलांतरित कामगारांना टपाल खात्याकडून दररोज जेवण पुरवण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे आतापर्यंत टपाल खात्याच्या मुंबई विभागातर्फे  देशभरात तब्बल १८०० किलोची औषधे आणि पीपीई किट पोचवण्यात आले आहेत. धारावी व भिवंडी यासारख्या सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या भागातील नागरिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपही करण्यात येत असल्याची माहिती पोस्टमास्तर जनरल स्वाती पांड्ये यांनी दिली. 

First Published on: April 19, 2020 4:39 PM
Exit mobile version