भिवंडी-ठाणे महामार्गावर खड्डेच खड्डे

भिवंडी-ठाणे महामार्गावर खड्डेच खड्डे

खड्डे

भिवंडी शहरातील विविध मुुख्य रस्त्यावर सतत पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांंचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना प्रवासी नोकरदार वर्गासह विद्यार्थी व महिला तसेच वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या जीवघेण्या खड्ड्यांतून प्रवास करताना आठवडाभरात 11 किरकोळ मोटारसायकल अपघात झाले आहेत, तर महामार्गावर एका पोलीसासह ठेकेदाराचा मुत्यू झाला आहे.

खड्ड्यांमुळे परिसरात सतत अपघात होत आहेत. मात्र, शासन व महापालिका प्रशासन या खड्ड्यांकडे व रस्त्याच्या दुरवस्थेकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासन व भिवंडी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी भिवंडी-ठाणे महामार्गावरील नारपोली येथील देवजीनगर चौकात पडलेल्या खड्ड्यात बसून महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

अचानक केलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व आंदोलनकर्त्यांची धरपकड करत त्यांना नारपोली पोलीस ठाण्यात नेवून समज देऊन या आंदोलनकर्त्यांची सुटका केली.

First Published on: July 14, 2019 4:27 AM
Exit mobile version