बाप्पाचे विसर्जनही खड्ड्यातूनच; पालिका, एमएसआरडीसीवर नागरिक नाराज

बाप्पाचे विसर्जनही खड्ड्यातूनच; पालिका, एमएसआरडीसीवर नागरिक नाराज

प्रातिनिधीक फोटो

यंदा मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने बाप्पाचे आगमन खड्डयातून करावे लागले. पण आता विसर्जनही खड्ड्यातूनच करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका विसर्जनाला

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकही रस्ता असा नाही की त्यावर खड्डे नाहीत. यंदा बाप्पाचे आगमनही खड्डयातून झाले होते. विसर्जनापर्यंत खड्डे बुजवले जातील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र ती ही फोल ठरली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या दिवशीही खड्डयातूनच बाप्पाची मिरवणूक काढावी लागल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली होती. इतक्या वर्षात प्रथमच रस्त्यावरील खड्डयातून बाप्पाचे आगमन व विसर्जन झाल्याची खंत गणेश भक्तांनी व्यक्त केली. कल्याण शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. कल्याण शीळ रोड हा एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येतो. मात्र या रस्त्यावरही खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर मोठया गाड्याकडून टोल वसुली केली जाते. मात्र तरी सुद्धा ह्या रस्त्याची देखभाल केली जात नाही. पालिकेच्या हद्दीत एमएसआरडीसी व पीडब्लूडी यांच्या अखत्यारीत अनेक रस्ते आहेत. मात्र पालिका प्रशासनाने स्वत:च्याच अखत्यारीतील रस्त्यांकडे कानाडोळा केला आहे. तर एमएसआरडीसी व पीडब्ल्यूडी यांनीही त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभाराचा फटका बाप्पाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीलाही बसला आहे.

First Published on: September 7, 2019 9:50 PM
Exit mobile version