बाईक रॅलीतून भाजपचे राज्यात शक्तीप्रदर्शन

बाईक रॅलीतून भाजपचे राज्यात शक्तीप्रदर्शन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीने देखील रविवारी वेगळ्या पध्दतीने प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. रविवारी भाजपने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करीत शक्तीप्रदर्शन केले. मुंबईत आयोजित केलेल्या रॅलीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या बाईक रॅलीमध्ये भाग घेत विजय संकल्प बोलून दाखविला. तर दुसरीकडे नाशिकमध्ये विना हॅल्मेट रॅली काढल्याने तर सोलापूरमध्ये विना परवानगी रॅली काढल्याने ही रॅली वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. भाजपतर्फे संपूर्ण देशभर “विजय संकल्प बाईक रॅली” आयोजन करण्यात येत असून रविवारी मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघात बाईक रॅली काढण्यात आली. प्रत्येक बुथवरील पाच युथ अशा प्रमाणात या बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.

मुंबईत सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रथम मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी वांद्रे -वरळी सी लिंक जवळ बांद्राच्या दिशेने बाईक रॅलीची एक तुकडी घेऊन स्वागत केले. बाईक रॅलीसह मुख्यमंत्र्यांचा वाहनांंचा ताफ्याने सांताक्रुजच्या दिशेने प्रयाण केले. खासदार पूनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात वाकोला येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला झेंडा दाखवून औपचारिक सुरुवात केली. खासदार पूनम महाजन, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार पराग अळवणी यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजचा भारत हा जशास तसे उत्तर देणारा भारत आहे. पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान व्हावेत म्हणून आजची विजय संकल्प बाईक रॅली असून आजचा तरुणाईचा उत्साह पाहिला की पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होणार याबाबत आता कुणाच्या मनात शंका राहिलेली नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद देत तरुणाईने मोदी… मोदी…मोदी असा जयघोष केला.त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः बाईक वर बसून या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झाले.

First Published on: March 4, 2019 4:59 AM
Exit mobile version