प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत; प्रवाशांनी पेढे वाटले

प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत; प्रवाशांनी पेढे वाटले

मुंबई-पुणे घाटमार्गावर धावणारी प्रगती एक्स्प्रेस कालपासून पुन्हा या मार्गावर धावू लागली. त्यामुळे प्रगती एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. दरम्यान मुंबई-पुणे घाटमार्गावर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने या मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन सर्व गाड्या सुरळीत सुरु होण्यास जानेवारी महिन्याची वाट पहावी लागेल, अशी शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

यंदा मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील मंकी हिल ते कर्जत दरम्यान रेल्वेमार्ग नादुरुस्त झाला. त्यामुळे तातडीने या मार्गावर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. ही दुरुस्तीची कामे अद्यापही सुरू आहेत. यासाठी प्रगती एक्स्प्रेससह अन्य काही एक्स्प्रेस बंद करण्यात येवून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. परिणामी प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. दरम्यान दुरुस्तीचे हे काम डिसेंबरअखेर किंवा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

प्रवाशांनी साजरा केला आनंद

दरम्यान प्रगती एक्स्प्रेस बंद ठेवण्यात आल्याने ठाणे-कर्जतपर्यंतचा प्रवास एक्स्प्रेसने करणाऱ्या प्रवाशांना लोकलने प्रवास करावा लागत होता. पण प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सोमवारी प्रगती एक्स्प्रेस पुन्हा धावू लागल्याने प्रवाशांनी तिकीट तपासनीससह लोको पायलटला पेढे भरवत आनंद व्यक्त केला.

First Published on: November 12, 2019 8:57 AM
Exit mobile version