…तर महाविकास आघाडीसोबत जाऊ; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

…तर महाविकास आघाडीसोबत जाऊ; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई: उद्धव ठाकरे म्हणाले तर महाविकास आघाडीसोबत जाऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपचे पते खुले आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत विचारणा केली. आम्ही होकार कळवून दिला. त्यांनी अजून होकार दिलेला नाही. उद्या ते म्हणाले आपल्याला महाविकास आघाडीसोबत जायचे आहे, तरी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले आपण दोघे युती करु तरी आम्ही तयार आहोत.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत असलेल्या मतभेदांबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, मागच्या निवडणुकीत  जागा वाटपावरून आमच्यात मतभेद झाले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक हरलेल्या पाच जागांपैकी दोन जागा मागत होतो. त्यालाही त्यांनी नकार दिला. यावरुन त्यांची मानसिकता दिसते.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक झाली. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यातील काही मुद्दे आम्ही लवकरात लवकर निकाली काढू, जेणेकरुन पुढे जाऊन काही अडता कामा नये. आम्ही एकत्र येणार असू किंवा आमची युती होणार असेल तर लवकरच जाहीर करु. तसेच महाविकास आघाडीसोबतही प्रकाश आंबेडकर येतील, असाही दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी बाबत उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी होताना अनेक बैठका झाल्या. विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. कोणते विषय भविष्यात अडचणीचे ठरु शकतात किंवा कोणते विषय अडचणीत आणू शकतात यावर सखोल चर्चा झाली. त्यानंतरच महाविकास आघाडी अस्तित्वात आली. आमची आघाडी केवळ सत्तेसाठी नव्हती. सक्षम विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही एकत्र आहोत. प्रकाश आंबेडकरांचीही तशीच मानसिकता आहे.

त्यामुळे भीम शक्ती- शिव शक्ती एकत्र येणार हे लवकरच स्पष्ट होईल व राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे काय असतील हेही समोर येईल.

First Published on: December 5, 2022 11:21 PM
Exit mobile version