पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची तयारी शहरासह ग्रामीण भागात पूर्णत्वास आली असून रंगरंगोटी, आकर्षक सजावट आणि रोषणाईमुळे ठिकठिकाणच्या देवी मंदिरांचे रुपडे पालटले आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गजबजाट वाढल्याचे दिसून येत आहे.

नवरात्रीच्या काळात घटस्थापना, देवीची पूजा, अखंड दीप, दुर्गासप्तशती पाठ, नवचंडी, होमहवन, उपवास, अष्टमी किंवा नवमीला कुमारीपूजन, ब्राह्मण-सवाष्ण भोजन आदी रिवाज अनेक कुटुंबांमध्ये होतात. त्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. शहरातल्या कालिकामाता मंदिर, रेणुकामाता, दुर्गा देवी मंदिर आदी ठिकाणची तयारी पूर्ण झाली आहे. विविध मंडळांतर्फे जागोजागी दांडियाचे आयोजन केले जात असून, त्याचीही तयारी पूर्णत्वास आली आहे. बहुसंख्य मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली असून, मूर्तीचे रंगकामदेखील पूर्ण झाले आहे.

मंदिरावर रोषणाई

मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून, सजावटीचे कामदेखील अंतीम टप्प्यात आहे. नऊ दिवसांची नवरात्र आणि दशमीला दसरा असा एकूण दहा दिवसांचा उत्सव दरवर्षी शहरात साजरा केला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासूनच सायंकाळी भोंडला खेळण्याची प्रथा अजूनही जपल्याचे दिसून येते. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया आणि विशेषतः मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

सजावटीसाठी स्टेज

घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी दुकानांत गर्दी होत आहे. तसेच सजावटीच्या वस्तूंसाठीही इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांत गर्दी वाढली आहे. सार्वजनिक मंडळाकडून तयारी केली जात आहे. चौकाचौकात मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंडळासाठी वीज कनेक्शन, महापालिकेची परवानगी आदी सोपस्कार केले जात आहेत. मंडळात अंतर्गत सजावट करण्यासाठी काही ठिकाणी मोठे स्टेज उभारले आहेत.

बाजारात महिलांची लगबग

नवरात्रौत्सव म्हणजे महिलांसाठी आनंदाचा सण असतो. यामुळेच भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यासाठी महिलांची खरेदीसाठी बाजारात लगबग दिसून येत आहे. पनवेलमध्ये नवरात्रीला लागणारे देवीचे घट खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. देवीच्या घटासोबत विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. यामध्ये लहान मोठ्या अशा दोन प्रकारच्या पत्रावळी आहेत. तसेच कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू या पाच फळांचा समावेश आहे.

First Published on: October 8, 2018 3:01 AM
Exit mobile version