जे.जे हॉस्पिटलमध्ये पीआरआय सुविधा; रुग्णांना साधता येणार डॉक्टरांशी संपर्क 

जे.जे हॉस्पिटलमध्ये पीआरआय सुविधा; रुग्णांना साधता येणार डॉक्टरांशी संपर्क 

जे.जे. रुग्णालय

सरकारी हॉस्पिटलच्या अनेक विभागांमध्ये मोबाईलमधील नेटवर्क अडथळ्यामुळे बहुतांश वेळा रुग्णांचा डॉक्टरांशी संपर्क होत नाही. यावर जे. जे रुग्णालय प्रशासनाने उपाय शोधून काढला असून येथे पीआरआय म्हणजेच प्रायमरी रेट एंटरफेस ही सुविधा सुरु केली आहे. या पीआरआय सुविधेमुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आता थेट डॉक्टरांशी संपर्कात राहणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितलं.

रुग्णांकडून अनेक तक्रारी

जे. जे हॉस्पिटल हे भारतातील सर्वात जुने सरकारी हॉस्पिटल असून बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, डॉक्टरांना रुग्णांशी सतत संपर्क ठेवणं कठीण जातं. तसंच, एखाद्या विभागातील डॉक्टरांची उपलब्धता पाहण्यासाठी रुग्ण त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर संपर्क करतात. मात्र, जे जे परिसरातील नेटवर्क अडथळ्यांमुळे संपर्क होतोच असं नाही. त्यासोबतच, रुग्ण गर्दीमुळे दूरध्वनी चालकांमार्फत डॉक्टरांशी संपर्क साधण्याकरता विलंब होत होता, अशा अनेक तक्रारी रुग्णांकडून मिळत असल्याची माहिती इंटरनेट प्रमुख तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिजित जोशी यांनी दिली. यावर उपाय म्हणून ही सुविधा सुरु केली आहे.

असा साधता येऊ शकतो संपर्क

पीआरआय सेवेसाठी हॉस्पिटल प्रशासनाने मुंबई महानगर टेलिफोनकडून २ स्वतंत्र अशा २३२२-२२०० आणि २३२२-२५०० या नंबरच्या पीआरआय लाईन्स उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या दोन्ही नंबरवर हॉस्पिटल आणि महाविद्यालयातील एक्स्टेंशन सेवा उपलब्ध होईल की, एखाद्या रुग्णास एखाद्या डॉक्टराची भेट घ्यायची असल्यास पहिले ४ क्रमांक ०२२-२३२२ हे डायल करुन नंतर त्या विभागाचा एक्स्टेंशन नंबर डायल केला की, रुग्णाचा थेट त्या डॉक्टरशी संपर्क होईल. यामुळे प्रशासकीय भवन, वसतीगृह, कॅन्टीन तसेच सर्व इतर कोणत्याही विभागातील‌ व्यक्तींशी संपर्क साधणे सहज सोपे होईल.

” जे. जे च्या इतिहासात पहिल्यांदाच रुग्ण आणि त्यांच्या नातेर्वइाकांच्या सुविधेसाठी पीआरआय ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. यातून जे. जे हॉस्पिटलच्या बाहेरील व्यक्ती देखील सर्व डॉक्टरांना त्यांच्या विभागात दूरध्वनी चालकांशी संपर्क न साधता देखील थेट एक्स्टेंशन नंबरवर संपर्क साधू शकतात. तशीच ही सुविधा अंतर्गतही जोडली जाईल. ” – डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, सर जे. जे समुह

First Published on: March 12, 2019 10:15 PM
Exit mobile version