मेंदडी आरोग्य केंद्राचा लसीकरणात सावळागोंधळ

मेंदडी आरोग्य केंद्राचा लसीकरणात सावळागोंधळ

येनकेन प्रकाराने चर्चेत असणार्‍या तालुक्यातील मेंदडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांच्या लसीकरणाच्यावेळी कर्मचार्‍याने स्वीकारलेल्या आडमुठ्या धोरणामुळे अन्य केंद्रातून परिचारिकेला पाचारण करण्याची वेळ आली. या गोंधळाने दूरदूरहून आलेल्या महिला मात्र चांगल्याच संतापल्या.

दुर्गम व डोंगराळ भागात वसलेली गावे याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर कायम अवलंबून असतात. या केंद्रामध्ये केव्हा डॉक्टर अभावी तर कधी कर्मचार्‍यांच्या अडेलतट्टू वागण्यामुळे आलेल्या रुग्णांसह सोबत आलेल्यांना नाहक मनःस्ताप सहन करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या आरोग्य केंद्रामध्ये दर बुधवारी 0 ते ५ वर्षांच्या आतील बालकांचे लसीकरण केले जाते. यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून 50 ते 60 महिला आपल्या बालकांना घेऊन आल्या होत्या. मात्र कर्मचार्‍याच्या आडमुठ्या धोरणामुळे लसीकरण दुपारी 1 वाजेपर्यंत झाले नसल्याने या महिला संतापल्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना धडपणे उत्तर दिले जात नसल्याने हा संताप अधिकच वाढला.

यावेळी तेथे पोहचलेल्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य महेंद्र पारेख, माजी उपसरपंच नदिम कादरी व वाहतूक संधटनेचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी कामचुकार कर्मचार्‍यांविरोधात तक्रार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या. लसीकरणासाठी खरसई येथून परिचारिकेला पाचारण करण्यात आले. याबाबत संबंधित महिला कर्मचार्‍याविरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी प्रभे यांनी दिली.

First Published on: August 24, 2019 1:25 AM
Exit mobile version