आधारवाडी जेलमधून फरार कैदी १० वर्षांनी जेरबंद

आधारवाडी जेलमधून फरार कैदी १० वर्षांनी जेरबंद

अटक

एका वेयरहाऊसच्या गोदामाचे शटर फोडून दोन लाख 67 हजार रुपयांचे कपडे बनविण्यासाठी लागणार्‍या धाग्यांची चोरी केल्याप्रकरणी नारपोली पोलीस शिताफीने तपास करून चार आरोपी गजाआड केले आहे. खळबळजनक बाब म्हणजे चार पैकी दोन सराईत गुन्हेगार असून, ते 10 वर्षांपूर्वी कल्याणाच्या आधारवाडी जेलमधून फरार झाले होते. शाबाद उर्फ पिल्ला अब्दुल वाहिद कुरेशी (23 रा. आदिवासीपाडा, भादवड) सागर उर्फ शिवमंगल ईश्वरदिन मिश्रा (32, रा. नायगाव, शांतीनगर) दलाल रामलाल चौहाण (, 23, रा. शिळफाटा, कल्याण ) राजू उर्फ राजकुमार वरसाती हरिजन (30, रा. मानखुर्द, मुंबई ) असे नारपोली पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत. चार पैकी सागर उर्फ शिवमंगल आणि राजू उर्फ राजकुमार हे सराईत गुन्हेगार असून, 10 वर्षांपूर्वी आधारवाडी जेलमधून फरार झाले होते.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावाच्या हद्दीतून प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये बी.एन.एस. रोड केरिअर्स नावाचे गोदाम आहे. या गोदामात लाखो रुपयांचे कपडे बनविण्यासाठी लागणारे धाग्यांचे (यार्न) ठेवण्यात आले होते. 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमाराला या चौघा आरोपीने वेयरहाऊसच्या गोदामाचे शटर फोडून 2 लाख 67 हजार 106 रुपयांची (यार्न) चोरी केली होती. याप्रकरणी 1 मार्च रोजी नारपोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करीत पोलीस उपनिरीक्षक मंगेश बोर्‍हाडे तपास करीत होते. पोलीस उपायुक्त अंकित गोयल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बोर्‍हाडे यांच्या पथकाने सापळा रचून चारही आरोपींना शिताफीने अटक केली आहे. या आरोपीकडून चोरीला गेलेला 2 लाख 67 हजार 106 रुपयांचा (यार्न) मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास नारपोली पोलीस करीत आहेत.

First Published on: March 20, 2019 4:12 AM
Exit mobile version