खासगी रेल्वेमुळे लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

खासगी रेल्वेमुळे लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रेल्वेत खाद्य पुरवठ्याची जबाबदारी इंडियन केटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) दिली आहे. मात्र ते आपले काम धड करत नाहीत. वारंवार त्यांच्या खाद्यात कधी अळी तर कधी ब्रेडला बुरशी लागलेल्या घटना समोर येत आहेत. अशा संस्थेला तेजस एक्स्प्रेस चालवायला देणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे आहे, असा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच भारतीय रेल्वेची विक्री थांबवा, रेल्वे वाढेल, तरच देश वाढेल अशी भूमिका सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने मांडली आहे. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 16 जानेवारीला बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम्ही संघटनेतर्फे खासगीकरणाविरोधात ठोस भूमिका मांडू, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सभागृहात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे 10 जानेवारी 2020 ला रेल बचावो संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रेल्वे कॉलनीची विक्री, रेल्वेचे खासगीकरण, तसेच इतर महत्वाच्या मुद्यांची माहिती देण्यासाठी मंगळवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

तेजसमुळे प्रवाशांना फटका
दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेसही 19 जानेवारीपासून अहमदाबाद ते मुंबई दरम्यान नियमित धावणार आहे. या खासगी ट्रेनमध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार्‍या सवलती मिळणार नाही. तसेच तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना वेळेवर पोहचविण्यासाठी अनेक रेल्वे गाड्यांना लूप लाइनवर टाकण्यात येतील. त्यामुळे खासगी तेजस एक्स्प्रेससाठी लाखो प्रवाशांना फटका बसणार आहे. यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांचे आणि रेल्वेचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे रेल्वेने हे खासगीकरण थांबवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ. प्रवीण बाजपेयी यांनी दिली आहे. तसेच जर एक तास डिझेलवर धावणारी रेल्वे गाडी लेट झाली तर 37 हजार रुपये नुकसान होते. तर इलेक्ट्रिक लोकोंवर धावणारी रेल्वे गाडी जर एक तास लेट झाल्यास 16 हजार रुपयांचे रेल्वेचे नुकसान होते. त्यामुळे 150 मार्गांवर खासगी रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

First Published on: January 15, 2020 3:09 AM
Exit mobile version