व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले

राज्य सामाईक परीक्षा केंद्राकडून (सीईटी सेल) विविध व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात सीईटी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. यातील काही परीक्षांचे निकालही लागले आहेत. मात्र अद्याप त्या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आवश्यक असलेली नियमावलीच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवेशपरीक्षा कशाच्या आधारावर सुरू करावी असा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती सीईटी सेलमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

इंजिनियरींग, अग्रीकल्चर, फार्मसी व फिशरी या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाची असलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे एमबीए, एमएमएस, एमसीए, एलएलबी पाच वर्षे, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमाची सीईटीची परीक्षा होऊन त्याचे निकाल लागले आहेत. तर अन्य बी.पी.एडी, बीएड, एम.पीएड, बीए/बीएस्सी बी.एड, एम.एड व एलएलबी 3 वर्षे या सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटीची परीक्षा झाली असून, लवकरच या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. परंतु यातील एकाही अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा सुरू झालेली नाही. काही अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षांचा निकाल एप्रिल, मे मध्येच लागला आहे. हे निकाल लागून एक ते दोन महिने उलटले तरी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कॉलेजमध्ये प्रवेश उशीरा झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता आहे. तसेच अभ्यासाला सुरुवात होताच लगेच परीक्षेला सुरुवात होईल, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना सहन करावा लागण्याची शक्यता पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी प्रवेश नियमावली असणे आवश्यक असते. मात्र ही नियमावलीच तयार नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडूनही नियमावली अभावी प्रवेश रखडले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक नियमावलीच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आली नसल्याने प्रवेश प्रक्रिया राबवता येत नाही. प्रवेश प्रक्रियासंदर्भातील नियमावली बनवण्यासाठीची सर्व माहिती संबंधित संचालनालयाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभाग सीईटी सेलकडे पाठवणे गरजेचे असते. मात्र ही माहिती अद्याप वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय, उच्च व तंत्र शिक्षण संचलनालय, मापसू यांच्याकडून आली नसल्याने नियमावली तयार झालेली नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बीई, एमबीए व इंजिनियरींगच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी 30 जूनपर्यंत तर एमबीबीएस, बीडीएस यांच्या प्रवेश प्रक्रियेची फेरी 5 जुलैपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. नियमावली तयार नसल्याने प्रवेश परीक्षा राबवण्यात अडचणी येत असून, मुदतीमध्ये पहिली फेरी पूर्ण करणे अशक्य असल्याची माहिती सीईटी सेलमधील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आली. मात्र प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील आवश्यक माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवली असून, येत्या दोन तीन दिवसांमध्ये नियमावली मिळण्याची शक्यता असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण संचलनालयातील अधिकार्‍यांनी दिली.

First Published on: June 7, 2019 5:32 AM
Exit mobile version