वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला संरक्षण द्यावे

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलला संरक्षण द्यावे

आमदार संजय केळकर यांचे अभिनंदन करताना बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे जयवंत डफळे, ठाणे शहर वृत्तपत्र विक्रीत असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, दिलीप चिंचोले, वैभव म्हात्रे, विवेक इसामे, भरत कुथे,मंगेश पवार आणि इतर पदाधिकारी.

राज्यातील वृत्तपत्र विक्रेते अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचे काम करतात. त्यांच्या महापालिका, नगरपालिका, तालुका, ग्रामीण भागातील स्टॉलला संरक्षण द्यावे तसेच वृत्तपत्र विक्रेते फेरीवाले नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तमानपत्रांचा ते महत्त्वाचा घटक आहेत.

तेव्हा राज्य भरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर अतिक्रमण विरोधी पथकाने कार्यवाही करुन नये यासाठी नगरविकास खात्याने संबंधित अधिकार्‍यांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. त्यावर राज्य नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांना संबंधित विभागाने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कार्यवाही करु नये यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सुचना त्वरीत द्याव्यात असे निर्देश दिले.

हीच मागणी यापूर्वीही विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आली होती, तेव्हा तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनी यापुढे कार्यवाही होणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा ही मागणी केली. मागील अनेक वर्षांपासून राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ शासनाकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलबाबत पाठपुरावा करीत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे येथील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर अतिक्रमण विरोधी पथकाने कार्यवाही केली होती, अक्षरशः स्टॉलची मोडतोड केली होती.

तेंव्हा राज्य संघटनेने ठाणे महापालिका आयुक्त व आमदार संजय केळकर यांना कार्यवाही न करता स्टॉलला कायम लायसन्स मिळावे असे पत्र लिहून कळवले होते. याची दखल घेत नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांना पत्र लिहून उत्तर ही मागवले. आमदार संजय केळकर हे कायम वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात, तेव्हा राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने त्याचे फोन करून अभिनंदन केले.

First Published on: July 2, 2019 4:35 AM
Exit mobile version