आगरी कोळी भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवा

आगरी कोळी भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवा

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात आगरी कोळी भूमिपुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, स्थानिक भूमिपुत्रांवर नेहमीच अन्याय करण्यात आला. फडणवीस सरकारने त्यांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक केली. त्यामुळे भूमिपुत्रांनी आता नव्या ठाकरे सरकारलाच साकडे घातले आहे. आगरी कोळी भूमिपुत्रांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव व आगरी कोळी भूमिपु़त्र महासंघाचे सल्लागार संतोष केणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच एका शेतकर्‍याची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने भूमिपुत्रांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही निवेदन दिले आहे.

आगरी कोळी भूमिपुत्रांच्या विविध प्रश्न आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाच्यावतीने अनेक आंदोलने करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भूमिपुत्रांच्या प्रश्नासंदर्भात अनेकवेळा चर्चा झाली, पण त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्याकडून वारंवार खोटी आश्वासने देऊन, गाजर दाखवण्याचे काम केले असा आरोप केणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही निवेदन देण्यात आले आहे. आपण शेतकरी नेते असून विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भूमिपूत्र आणि शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आगरी कोळी भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या दालनात बैठक मिळावी अशी विनंतीही केणे यांनी केली आहे.

काय आहेत मागण्या?

27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात यावी, कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, ग्रोथ सेंटर तसेच कल्याण शीळ रस्ता रुंदीकरणातील बाधित शेतकर्‍यांना मोबदला मिळावा, नेवाळी विमानतळ परिसरातील शेतकर्‍यांचे प्रश्न, नेवाळी आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यात यावे, ठाण्यातील बाळकूम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, घोडबंदर, डोंबिवली प्रिमीअर कंपनी येथील जमिनी शेतकर्‍यांना परत मिळणेबाबत, लोढा ग्रुपकडून होत असलेली शेतकर्‍यांची फसवणूक, डायघर डम्पिंग ग्राऊंडची समस्या, कळवा, मुंब्रा, दिवा टोरंट पॉवर कंपनीचा ठेका रद्द करावा, श्री दत्त रेती व इतर औद्योगिक संस्था व श्री मुंब्रा देवी रेती उत्पादक ड्रेजर सहकारी सोसायटी यांच्यावरील अन्यायाबाबत, मुंबई कुळ वहिवाट अधिनियम 1948 च्या कलम 29 नुसार ठाणे जिल्ह्यातील जमिनी कुळांना परत मिळणेबाबत, मुंबई ठाणे येथील गावठान जमिन व कोळीवाड्याचा प्रश्न आदी मागण्यांकडे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

First Published on: December 7, 2019 1:27 AM
Exit mobile version