१८७४ सालच्या शाळेवर नगर पंचायतीचा हातोडा

१८७४ सालच्या शाळेवर नगर पंचायतीचा हातोडा

मोक्याच्या जागेवर येथील केंद्रीय शाळा क्रमांक १ पाडून त्याजागी नगर पंचायतीची भव्य इमारत बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. तसा प्रस्ताव मंजूर झाला आहे. सव्वापाच कोटी रुपये इतका यासाठी खर्च येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा फलक नाझ हुर्जुक यांनी दिली. मात्र ही ऐतिहासिक इमारत पाडण्याला अनेक स्थानिकांनी विरोध केला आहे.

बाजारपेठ भागात ९ गुंठे क्षेत्रावर या शाळेची इमारत असून, आठ खोल्यांच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. चुना व दगडाचे बांधकाम असलेली ही इमारत १८७४ मध्ये (१४५ वर्षांपूर्वी) उभी राहिली आहे. जंजीरा संस्थानचा कासीम खान नंतरचा नबाब अहमदखान हा १८७० च्या दरम्यान गादीवर बसल्यानंतर संस्थानची शैक्षणिक व अन्य बाबतीत योग्य ती प्रगती होण्याच्या दृष्टीने ही वास्तू बांधण्यात आली. त्यावेळी हिंदू व मुस्लीम विद्यार्थी एकत्र शिकत असत. त्यांना मराठी व उर्दू शिकविण्याची जबाबदारी कर्णिक व काजी मास्तर यांच्यावर होती. अशी ही ऐतिहासिक इमारत पाडून टाकण्याऐवजी तिचे जतन करण्याची मागणी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के व इतरांनी केली आहे. ही शाळा आता कन्याशाळेत हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

रायगड जिल्हा परिषदेची इमारत नगरपंचायतीकडे वर्ग करावी असा प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदेकडे पाठविला. तो मंजूर झाला आहे. शाळा क्रमांक १ ची इमारत हस्तांतर होताना विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही.
-संजय कर्णिक, उप नगराध्यक्ष

नगर पंचायत हद्दीत रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळे शाळा क्रमांक १, म्हसळे उर्दू, आदिवासी वाडी, सावर व चिराठी अशा ५ शाळा असून, तेथे २७५ विद्यार्थी व १२ शिक्षक आहेत. कोणत्याही शाळेचा हस्तांतरणाबाबतचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही.
-संतोष शेडगे, प्रभारी गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती

First Published on: August 16, 2019 1:07 AM
Exit mobile version