लोकलच्या विलंबावर रेल्वेचा मास्टर प्लॅन

लोकलच्या विलंबावर रेल्वेचा मास्टर प्लॅन

रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रवासी संघटनेची बैठक

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने चाकरमन्यांना त्याचा खूपच त्रास होत आहे. त्या संदर्भात डोंबिवलीतील प्रवाशी संघटना व प्रमुख कार्यकर्त्यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांची भेट घेतली. त्यांच्या दालनात तब्बल साडेतीन तास मॅरेथॉन बैठक पार पडली. सिग्नलवर दगडफेकीचे वाढते प्रकार आणि रेल्वे फाटक आदी अनेक कारणांमुळे लोकल उशिरा धावत आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेने शंभर दिवसाचा मास्टर प्लॅन आखल्याची माहिती जैन यांनी बैठकीत दिली.

या कारणांमुळे होतो रेल्वेला उशीर

रेल्वेच्या सिग्नलवर दगड मारण्याचे प्रमाण वाढले आहेत. यंदा सिग्नल फोडण्याची २५ प्रकरणे घडली. तसेच वडवली, दिवा, कळवा या तीन रेल्वे फाटकांमुळे तसेच जॉईंट फ्रॅक्चर, स्लीपर्स खराब होणे आदी प्रमुख कारणांमुळे रेल्वे उशीराने धावत असल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तीनही रेल्वे फाटक बंद होत नाही तोपर्यंत रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणारच असेही रेल्वेने स्पष्ट केले. तसेच सिग्नलवर दगड मारून फोडले जातात, चालत्या गाडीवर दगड मारून प्रवाशांना जखमी केले जाते. अशा काही प्रमुख ठिकाणांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष आहे. पण सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांनीसुद्धा पुढाकार घेत हे प्रकार थांबविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

१०० दिवसांचा मास्टर प्लान

रेल्वे ट्रॅकवर पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे रेल्वे थांबवाव्या लागतात. त्यासाठी युद्धपातळीवर रेल्वे ट्रॅक उचलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बाहेरगावच्या मेलपेक्षा प्रवासी लोकलला प्राधान्य दिले जाणार आहे. वसईसह दक्षिण-पूर्व म्हणजेच लोणावळामार्गे येणाऱ्या सर्व गाड्यांना नवीन पाचव्या व सहाव्या ट्रॅकवर चालविण्यात येणार आहेत. लोकल व मेल गाड्यांचे स्पीड लिमीट वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल स्थानकात लवकर दाखल होतील. त्यासाठी विद्याविहार, ठाणे आणि डोंबिवली स्थानकांच्या फलाटांमध्ये बदल करण्यात येणार आहे. मात्र यासाठी लोकांच्या सहकार्याची अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली. रेल्वेने पहिल्यांदाच आधुनिक व नवनवीन तांत्रिक बदल स्विकारले आहेत. अधिकारी वर्ग अत्यंत मेहनतीने काम करत आहेत. त्यासाठी हा शंभर दिवसांचा मास्टर प्लान आखण्यात आला असून त्यात विविध कामे केली जाणार आहेत.

प्रवाशांनी सहकार्य करावे

या कामात प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. डोंबिवली रेल्वे पादचारी पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असून, पूर्वेतील बंद असलेली लिफ्ट लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

First Published on: June 27, 2019 7:18 PM
Exit mobile version