क्रेडिट कार्डद्वारे काढा रेल्वे तिकीट

क्रेडिट कार्डद्वारे काढा रेल्वे तिकीट

प्रातिनिधिक फोटो

क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर चित्रपटगृहांपासून ते हॉटेलपर्यंत सर्व ठिकाणी केला जातो. आता याच धर्तीवर लोकल तिकीटदेखील क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे काढता येणार आहे. मध्य रेल्वेने २२ स्थानकांवरील एटीव्हीएम मशिनमध्ये पीओएस तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रेडिट-डेबिट (सीडी) कार्डधारक लाखो प्रवाशांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. तिकीट खिडकीवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकल तिकीट क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे देता येऊ शकेल का, याबाबत चाचपणी करण्यासाठी ‘रेल्वे सूचना प्रणाली केंद्रा’ने (क्रिस) सुमारे १२ महिन्यांपासून पाठपुरावा केला. अखेर एटीव्हीएम मशिनमधील हार्डवेअरमध्ये बदल करून त्यामध्ये पीओएस मशिन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. यामुळे सीडी कार्डमधून लोकल तिकीट मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई विभागातील २२ स्थानकांवर एकूण ३१ एटीव्हीएममध्ये सीडी कार्ड मशिन कार्यरत करण्यात येणार आहे. यात मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांचा समावेश आहे. तसेच पुणे विभागातील पाच स्थानकांवर आठ, सोलापूर विभागातील तीन स्थानकांवर चार, नागपूरमधील पाच स्थानकांवर सहा आणि भुसावळ विभागातील तीन स्थानकांवर तीन एटीव्हीएममध्ये सीडी कार्ड मशिन कार्यन्वित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर एकूण ५१ सीडी कार्ड मशिन कार्यन्वित होणार आहे. सद्य:स्थितीत स्थानकातील एटीव्हीएमची देखभाल-दुरुस्ती फोर्ब्स या खासगी कंपनीकडून करण्यात येत आहे. सीडी कार्ड मशिन कार्यन्वित झाल्यानंतर त्याची देखभाल-दुरुस्तीही हीच कंपनी करणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली.

सीडी कार्ड मशिन कार्यन्वित होणारी स्थानके
-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, पनवेल, दादर (मध्य), मुलुंड, कल्याण, ठाणे, डोंबिवली, विक्रोळी, भांडुप, शीव, कांजुरमार्ग, मुंब्रा, बदलापूर, कुर्ला, उल्हासनगर, विद्याविहार, अंबरनाथ, नेरुळ, दिवा, कळवा, खारघर.

गर्दीच्या स्थानकांना प्राथमिकता
मध्य रेल्वेवर सध्या ४५० पेक्षा जास्त एटीव्हीएम मशिन्स आहेत. संपूर्ण तिकीट विक्रीमध्ये एटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून २४ टक्के तिकीटविक्री होते. तर तिकीट खिडक्यांवरून ६० टक्के तर मोबाइल माध्यमातून फक्त २ तर बाकी १४ टक्के इतर माध्यमातून तिकीट विक्री होते. मध्य रेल्वे मार्गावर सुरुवातीला ज्या स्थानकांवर गर्दी जास्त आहे, त्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. अशा गर्दीच्या स्थानकांतील एटीव्हीएमवरच किंवा प्रत्येक स्थानकातील दोन ते तीन एटीव्हीएमवरही पीओएस यंत्रे बसविण्यात येणार आहेत, अशी माहितीही रेल्वे अधिकार्‍यांनी दिली आहे.

First Published on: May 21, 2019 5:18 AM
Exit mobile version