शहाड रेल्वे स्थानकात बिनधास्त रेल्वे क्रॉसिंग…!

शहाड रेल्वे स्थानकात बिनधास्त रेल्वे क्रॉसिंग…!

शहाड स्थानकावर रेल्वे क्रॉसिंग

रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतू शकतं हे माहित असतानाही अनेकदा प्रवासी निर्धास्तपणे रुळ ओलांडताना दिसतात. शहाड रेल्वे स्थानकात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. रेल्वे रूळ ओलांडत असताना यापूर्वी अनेकवेळा प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या असतानाही प्रवासी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

फलाटावर विविध समस्या 

कल्याण आणि उल्हासनगर या दोन शहराच्या मध्यवर्ती मध्य रेल्वेचे शहाड रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज साधारण ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. रेल्वेच्या तिजोरीत महिन्याला सव्वा कोटी उपन्न जमा होते. मात्र रेल्वेकडून प्रवाशांना फारशा सोयी सुविधा नाहीत. दोन फलाटावर अस्वचछता, पादचारी पुलावरील दिवे कधी सुरू तर कधी बंद, दारुडे आणि गर्दुल्ले यांचा वावर अशा समस्यांच्या सामना करतच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मात्र पादचारी पूल असताना रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडत असतात.

रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा

रेल्वे रूळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरी सुध्दा प्रवाशांकडून या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळ यांच्यासमोरच प्रवासी बिनधास्तपणे रेल्वे रूळ ओलांडत असतात. रेल्वे रूळ ओलांडण्याच्या गडबडीत अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यातून प्रवाशांनी कोणताच धडा घेतलेला नाही. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापल्याड कळवा, मुंब्रा, दिवा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, आसनगाव, कर्जत, कसारा, खोपोली आदी प्रमुख स्थानकांसह वांगणी, नेरळ, शेलू, भिवपुरी या लहान स्थानकांवर दिवसाला सरासरी २ प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमवावा लागत असल्याचे रेल्वेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

First Published on: March 30, 2019 9:38 AM
Exit mobile version