कचरा करणार्‍यांकडून रेल्वे दंड वसूल करणार

कचरा करणार्‍यांकडून रेल्वे दंड वसूल करणार

Indian railway

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘प्लास्टिक मुक्त भारत’ अभियानाची घोषणा केली. त्यानुसार मध्य रेल्वेनेही स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. रेल्वे स्थानके, रेल्वे गाड्या, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, हॉस्पिटले इत्यादी ठिकाणी स्वच्छतेची कामे पार पाडली जात आहेत. तसेच प्लास्टिक बंदीमुळे कचरा संकलनसाठी रेल्वेने मोठे अभियान सूरू केले आहे. १७ सप्टेंबर रोजी रेल्वे भारतभर श्रमदानातून प्लास्टिक कचर्‍याचे संकलन करणार आहे. २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून रेल्वे परिसरात कचरा करणार्‍यांवर दंड ठोठावणार आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मध्य रेल्वेनेही या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रमुख रेल्वे स्थानकांकडे जाणारे मार्ग स्वच्छ करणे, कार्यक्षमतेने पाण्याचा वापर करणे, प्लास्टिकवर बंदी घालण्यासह घनकचरा व्यवस्थापन करणे इत्यादी बाबींकडे रेल्वे विशेष लक्ष देणार आहे. स्वच्छतेसाठी रेल्वे कर्मचारी, अधिकार्‍यांसोबत मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था, प्रवाशांचाही यात सक्रीय सहभाग असणार आहे. दरम्यान, स्वच्छतेविषयी जनजागृती करत असताना मध्य रेल्वे प्रदूषणविरोधी सिद्धांतानुसार कचरा करणार्‍याविरूद्ध दंड ठोठावणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता यांनी सांगितले. यासोबतच मध्य रेल्वेने पंढरपूर, साईनगर शिर्डी, दुधनी, वाडी आणि दौंड येथे नर्सरी विकसित केल्या असून तेथे सर्व प्लॉस्टिकचे संकलन करून तेथेच त्याची योग्य विल्हेवाट लावली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत या महिन्यात मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर विभागांत आणखी 10 नर्सरी उभारण्यात येणार आहेत. प्लास्टिकमुक्त या संकल्पनेच्याच आधारे पर्यावरणाला वाचविण्यासाठी मध्य रेल्वेने 19 ऑगस्टपर्यंत राज्याच्या वन विभागासमवेत संयुक्तपणे पाच लाखांहून अधिक रोपे लावली.

श्रमदानातून प्लास्टिक कचरा संकलन
17 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये ‘प्लास्टिक कचरा संकलन’ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रत्येक स्थानकावर श्रमदान केले जाणार असून या श्रमदानामध्ये सर्व रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, युनियन प्रतिनिधी, निवृत्त कर्मचारी, बचतगट यांचा सहभाग असणार आहे.

First Published on: September 17, 2019 1:32 AM
Exit mobile version