दोन स्थानकांदरम्यानचे अपघात टाळण्यासाठी रेल्वेचा पुढाकार

दोन स्थानकांदरम्यानचे अपघात टाळण्यासाठी रेल्वेचा पुढाकार

रेल्वेचा प्रातिनिधीक फोटो

अपघात टाळण्यासाठी पुलाचा वापर करा, अशी घोषणा रेल्वे वारंवार करत असते. रेल्वेस्थानकावर पुल उपलब्ध असल्यामुळे लोक त्याचा वापर करु शकतात. मात्र दोन रेल्वेस्थानकादरम्यान ज्या ठिकाणी वस्ती आहे तिथल्या लोकांना मात्र ट्रॅक वरून जाण्याशिवाय पर्याय नसतो. नुकतेच कांदिवली आणि बोरीवली दरम्यान पोयसर येथे रेल्वे रुळ ओलांडत असताना एकाच कुटुंबातील चार भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने अपघातग्रस्त असलेल्या दोन रेल्वेस्टेशन दरम्यान फुट ओवर ब्रिज आणि भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण २६ ठिकाणी असे ब्रिज बांधले जाणार असून पहिल्या टप्प्यात १० ब्रिज बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

रेल्वे रूळ ओलांडताना २०१७ मध्ये १६५१ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २०१६ साली १७९८ लोकांचा ट्रेन किंवा एक्सप्रेस गाड्यांना धडकून मृत्यू झाला होता. दोन स्टेशनदरम्यान वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याच्या विचारात रेल्वे प्रशासन आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन स्टेशनदरम्यान २६ धोकादायक स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. यात सर्वात जास्त अपघात होत असलेल्या हार्बर मार्गावरील १० ठिकाणी सर्वात आधी ब्रिज बांधले जाणार आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने यासाठी निविदा प्रक्रिया सुद्धा सुरु केली आहे. पावसाळा संपल्या नंतर या कामांची सुरुवात करण्यात येईल, असे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या स्थानकाच्या दरम्यान बनणार फुट ओवर ब्रिज

शिवडी – वडाळा

वडाळा – किंग सर्कल

वडाळा – गुरु तेग बहादूर नगर

गुरु तेग बहादूर नगर – चुनाभट्टी

गोवंडी – मानाखुर्द

वाशी – सानपाडा

नेरूळ – सीवूड

सीवूड – बेलापूर

खांदेश्वर – पनवेल

First Published on: May 18, 2018 9:59 AM
Exit mobile version