अमित ठाकरे कोरोना निगेटीव्ह, राज ठाकरे पोहोचले लिलावतीत

अमित ठाकरे कोरोना निगेटीव्ह, राज ठाकरे पोहोचले लिलावतीत

दोन दिवसांपासून येणारा ताप कमी होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी आज खुद्द राज ठाकरे हे लीलावतीत दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अमित ठाकरे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

आज दुपारी १२.१५ च्या सुमारास राज ठाकरे लिलावतीत अमित ठाकरे यांना पाहण्यासाठी दाखल झाले. त्याआधी अमित ठाकरे यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून लिलावतीत उपचार सुरू आहेत. ताप उतरत नसल्याने अमित ठाकरे यांची प्रकृती सातत्याने खालावत होती, म्हणूनच त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीलाच कोरोनाची चाचणी करण्यात आली, पण ही चाचणी निगेटीव्ह आल्याचे कळते. मलेरिया आणि इतर आजारांच्या चाचण्याही डॉक्टरांकडून करण्यात आल्या. पण या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत असे कळते. खबरदारीचा उपाय म्हणून आगामी दोन ते तीन दिवस अमित ठाकरे यांना रूग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे कळते. कोरोनाच्या काळात अमित ठाकरे यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात येणार आहे. आगामी दोन ते तीन दिवसांमध्ये योग्य त्या खबरदारीनंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती आहे. अमित ठाकरे हे कोरोना काळातही अनेक ठिकाणी सक्रीयपणे मदतीचे काम करत होते. त्यामध्ये आरोग्य सेविकांचा मुद्दा घेऊन ते प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेले होते. तसेच डॉक्टरांना मदत म्हणून त्यांनी फुड पॅकेटचे वितरणही केले होते. मुंबईतल्या आरे बचावच्या मुद्द्यावरही अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले होते. अमित ठाकरे यांच्यासोबतच शर्मिला ठाकरे यांनीही आंदोलनात सहभाग घेऊन आरे वाचवा मोहीमेला पाठिंबा दिला होता.


 

First Published on: October 19, 2020 1:23 PM
Exit mobile version