राजावाडी हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर; सीटी स्कॅन, ऑपरेशन थिएटर बंद

राजावाडी हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर; सीटी स्कॅन, ऑपरेशन थिएटर बंद

Rajawadi hospital

पूर्व उपनगरात मुलुंडपासून कुर्ला व मानखुर्दपासून चेंबूरपर्यंतच्या रुग्णांसाठी विद्याविहार येथील राजावाडी हॉस्पिटल सोयीचे पडते. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र असे असले तरी हॉस्पिटलमधील सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. हॉस्पिटलमधील सीटी-स्कॅन मशीन ४ महीने बंद असून ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑपरेशन थिएटर अनेक महिन्यांपासून बंद आहे. डॉक्टर, कर्मचारी व सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे रांगेमधील रुग्णांमध्ये सर्रास बाचाबाची होते. राजावाडी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज दीड हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.

गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना सीटी स्कॅनसाठी सायन किंवा केईएम पाठवले जाते. अनेक रुग्णांना खासगीरित्या सीटी स्कॅन करण्यास सांगण्यात येते. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन १ हजार रुपयांमध्ये होत असताना खासगी हॉस्पिटलमध्ये साडेतीन ते चार हजार रुपये रुग्णांना मोजावे लागतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नातेवाईकांनाच रुग्णांना व्हीलचेअर किंवा ट्रॉलीवरून ईसीजी, क्षकिरण काढण्यासाठी एका विभागातून दुसर्‍या विभागात न्यावे लागते.

कर्मचार्‍यांअभावी बाह्यरुग्ण व हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांची नोंदणी करण्यासाठी एकच खिडकी असल्याने या खिडकीवर रुग्णांमध्ये रोज वाद होतात. तसेच हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षकांची संख्याही कमी असल्याने हे वाद सोडवण्यासाठी कोणीही येत नाही. त्यामुळे अनेकदा हे वाद विकोपाला जातात. त्याचप्रमाणे डॉक्टरांची संख्याही अपुरी असल्याने बाह्यरुग्ण विभागामध्ये येणार्‍या रुग्णांना तासन्तास ताटकळत उभे रहावे लागते. ही रांग बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीच्या बाहेरपर्यंत जाते. त्यामुळे वृद्ध नागरिक व महिलांचे प्रचंड हाल होतात. तसेच शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांनाही डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येमुळे कधी शस्त्रक्रिया करण्यात येईल हे नेमकेपणाने सांगण्यात येत नाही. त्यामुळे बहुतेक रुग्ण अन्य रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतात. हॉस्पिटलमधील मुख्य शस्त्रक्रियागृह सुरू असले तरी ट्रॉमा इमारतीमध्ये असलेले शस्त्रक्रियागृह अनेक दिवसांपासून बंद आहे. हे शस्त्रक्रियागृह सुरू केल्यास ताण कमी होईल, अशी माहिती विद्याविहारमधील शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया यांनी दिली.

हॉस्पिटलमधील रक्ततपासणी विभागातही कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने अनेक रुग्णांना रक्ततपासणीसाठी 15 दिवसांनंतरची तारीख दिली जाते. त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना खासगी पॅथोलॉजी लॅबमधून रक्ततपासणी करून आणावी लागते. तसेच फार्मासिस्टची संख्याही कमी असल्याने रुग्णांना औषधे घेण्यासाठी बरीच रांग लावावी लागत आहे. हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर नोंदणी करण्यापासून ते औषधे घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी रुग्णाला त्रास होत असल्याने त्यांची अवस्था ‘उपचार नको पण त्रास आवरा’ अशी झाली आहे.

सुरक्षारक्षकांची मागणी

महापालिकेच्या केईएम, सायन व नायर हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या सुरक्षारक्षकांप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राजावाडी हॉस्पिटलमध्ये दररोज दीड हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे त्यांना होत असलेल्या त्रासामुळे वारंवार त्यांच्यामध्ये वाद होतात. परिणामी डॉक्टर व अन्य कर्मचार्‍यांना मारहाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेला सुरक्षारक्षक तैनात करणे शक्य नसल्यास त्यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना तैनात करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी केली.

सातारची रूग्ण वैतागून गावी परत

किडनीस्टोन व हर्नियामुळे त्रस्त असलेल्या सातारामधील शिगाव येथील कुदाजानबी मुबारक मुलानी या उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. परंतु वारंवार फेर्‍या मारल्यानंतरही त्यांना डॉक्टरांकडून उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत नव्हते. अनेक फेर्‍या मारल्यानंतर आणि काही नातेवाईकांच्या ओळखीनंतर वॉर्डमध्ये दाखल केले गेले, पण डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येमुळे त्यांच्याकडून लक्ष दिले जात नव्हते. डॉक्टर पुरेसे लक्ष देत नसल्याने त्यांनी हॉस्पिटलमधून पुन्हा सातार्‍याला जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन मशीन जुनी झाल्यामुळे ती बंद आहे. परंतु नवीन मशीन बसवण्यासंदर्भात महापालिकेला प्रस्ताव पाठवला आहे. तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन्स, सुरक्षारक्षक यांच्या कमी असलेल्या संख्येबाबतही पालिकेला प्रस्ताव पाठवला असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. – डॉ. विद्या ठाकूर, डीन, राजावाडी हॉस्पिटल.

First Published on: September 19, 2018 7:01 AM
Exit mobile version