Corona Effect: डॉक्टरांनी संवेदनशीलता बाळगा, दवाखाने उघडे ठेवा – आरोग्यमंत्री

Corona Effect: डॉक्टरांनी संवेदनशीलता बाळगा, दवाखाने उघडे ठेवा – आरोग्यमंत्री

आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यात अनेक ठिकाणाहून स्थानिक डॉक्टर करोनाच्या भितीमुळे किंवा पोलिसांच्या भितीमुळे दवाखाने बंद ठेवत असल्यामुळे इतर आजारांच्या स्थानिक रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकवरून लोकांशी संवाद साधताना राज्यभरातल्या स्थानिक डॉक्टरांना आवाहन केलं आहे. ‘नगरमध्ये एका लहान मुलाला घेऊन त्याचे आई-वडील दिवसभर फिरत होते आणि नगरमधले सर्व दवाखाने बंद होते. हे धक्कादायक आहे. आपणच संवेदनशीलता दाखवली नाही, तर सामान्य जनतेनं जायचं कुणाकडे?’ असा सवाल
देखील आरोग्यमंत्र्यांनी विचारला आहे.

डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवण्याविषयी ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खासगी दवाखाने भितीपोटी बंद ठेवण्यात आले आहे. आजच्या काळात ते चुकीचं होईल. आपण डॉक्टरकीच्या व्यवसायाकडे नोबल प्रेफेशन म्हणून पाहातो. त्यामुळे सगळ्यांनी दवाखाने सुरू ठेवावेत ही माझी विनंती आहे. पोलिसांना सूचना केल्या आहेत की दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. तुमचं ओळखपत्र दाखवून काम धीराने सुरू ठेवा. करोनाशिवाय देखील इतर तातडीचे ह्रदयाचे किंवा गंभीर आजार असू शकतात, ज्यांना उपचार मिळणं गरजेचं आहे’, असं ते म्हणाले.

‘डिस्चार्जचीही संख्या आता वाढेल’

दरम्यान, यावेळी बोलताना राजेश टोपेंनी करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांच्या डिस्चार्जची देखील संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘आज महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १३५वर पोहोचली आहे. ४२२८ टेस्ट केल्या. त्यात ४११७ निगेटिव्ह आल्या. १९ रुग्णांना आपण डिस्चार्ज केलं आहे. १४ दिवस तुमच्यात लक्षणं दिसतात. त्यानंतर २४ तासांत २ टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज केलं जातं. त्यामुळे डिस्चार्जची संख्या वाढेल असा मला विश्वास आहे’, असं ते म्हणाले.
तसेच, विमानं बंद केल्यामुळे बाहेरून येणाऱ्या करोनाची शक्यता संपली आहे. पण आत्ता असलेल्या करोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांना होणाऱ्या करोनावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत’, असं देखील ते म्हणाले.

‘फक्त ८ दिवसांचं रक्त शिल्लक’

आपल्याकडे ७ ते ८ दिवस पुरेल इतकंच रक्त शिल्लक आहे. त्यामुळे संचारबंदीचा भंग न करता रक्तदान करावं. रक्ताची जागा कुणीही घेऊ शकत नाही. शिवाय रक्ताची शेल्फ लाईफ ३५ दिवसांचीच असते. त्यामुळे त्याचा साठा करून नंतर ते वापरता येत नाही. शिवाय रक्ताची गरज फक्त करोनासाठीच नाही, तर इतरही अनेक गंभीर आजारांसाठी लागते. जिल्हाधिकाऱ्यांना, पोलिसांना सांगितलं आहे की रक्तदानाचे कॅम्प झालेच पाहिजेत’, असं टोपेंनी नमूद केलं.

पीपीई, एन ९५ फक्त करोना डॉक्टरांसाठीच!

‘सर्व डॉक्टरांना, नर्सेसला पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट) आणि एन ९५ हे मास्क COVID-19 अर्थात करोनाचे रुग्ण ट्रीट करायचे असतील तर त्यांना पुरवले जातात. अन्यथा साधे मास्क आणि गाऊन घालून देखील काम करता येतं. त्यामुळे भितीपोटी किंवा आग्रहामुळे त्या मास्कशिवाय कामच न करणं हे चुकीचं आहे’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद न ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!
First Published on: March 27, 2020 12:41 PM
Exit mobile version