व्यावसायिकाच्या फसवणुकीप्रकरणी रणजी क्रिकेटपटूला अटक

व्यावसायिकाच्या फसवणुकीप्रकरणी रणजी क्रिकेटपटूला अटक

व्यावसायिकाच्या फसवणुकीप्रकरणी रणजी क्रिकेटपटूला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.  मिरनाक ऊर्फ शशांक सुनिलकुमार सिंग असे त्याचे नाव आहे.  त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने तक्रारदार व्यावसायिकासह इतरांना महागडे घड्याळ आणि मोबाईल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

लिलावात अनसोल्ड राहिल्याने शशांक सिंगची आयपीएलमध्ये खेळण्याची संधी चुकली होती. यातील तक्रारदार विलेपार्ले परिसरात राहत असून दोन वर्षांपूर्वी त्यांची शशांकसोबत ओळख झाली होती. यावेळी त्याने तो हरियाणाचा रहिवाशी असून रणजी क्रिकेटपट्टू असल्याचे सांगितले होते. त्याचे अनेक भारतीय क्रिकेटपट्टूशी चांगली ओळख आहे. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना सोशल मिडीयावर फ्रेंण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. ही रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांना शशांकचे काही क्रिकेटपट्टीसोबत असलेले फोटो आणि व्हिडीओ दिसले होते. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास बसला होता. त्याने त्यांना पबमध्ये नेले आणि तिथे त्यांच्यावर काही पैसे खर्च केले होते. स्वस्तात महागडे घड्याळ आणि मोबाईल देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना घड्याळ आणि मोबाईल दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळत होता.

फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच या व्यावसायिकाने त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली.  पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. ही शोधमोहीम सुरु असतानाच शशांक हा अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीतकुमार वर्तक यांच्या पथकातील दत्तात्रय मसवेकर, भारत माने, भोसले, माने यांनी या हॉटेलमधून छापा टाकून शशांकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

शशांकने हरियाणा संघाकडून रणजी सामने खेळले होते. तो 2019, 2019, 2020 या तीन वर्षांत आयपीएलच्या लिलावात होता. त्याला कोणत्याही संघाने घेतले नव्हते. त्यामुळे आयपीएल खेळता आले नाही. तो क्रिकेटपट्टूसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन अनेकांचा विश्वास संपादन करीत होता. अशाच प्रकारे त्याने काही लोकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

First Published on: May 6, 2022 9:01 PM
Exit mobile version