दुर्मीळ हृदयविकारावर उपचार करून वाचवले 9 वर्षांच्या मुलाचे प्राण

दुर्मीळ हृदयविकारावर उपचार करून वाचवले 9 वर्षांच्या मुलाचे प्राण

मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांना 9 वर्षांच्या तेजसच्या हृदयविकारावर उपचार करून जीवदान देण्यास यश आले आहे. दुर्मीळ हृदयविकार असलेला धुळ्यातील तेजस अहिरे हा वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. वयाच्या पहिल्या वर्षी त्याच्यात जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. तेजस हा ‘ब्ल्यू बेबी’ प्रकारात मोडत असून, त्याला धाप लागत होती तसेच वजन वाढत नव्हते. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना समजले की, त्याच्या शरीरातील महाधमन्यांची अदलाबदल झाली आहे, हृदयाच्या खालील दोन कप्प्यांमध्ये दोन मोठी छिद्र आहेत आणि फुफ्फुसामध्ये रक्तपुरवठ्याची कमतरता आहे. पण परिस्थिती बेताची असल्याने उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचा खर्च तेजसच्या कुटुंबाला झेपणारा नव्हता. अशा प्रकारच्या रुग्णावर सामान्यपणे दोन टप्प्यांमध्ये (ग्लेन शंट आणि फॉन्टॅन कम्प्लिशन) शस्त्रक्रिया केली जाते. अशाप्रकारे दोन महिन्यांच्या अंतराने शस्रक्रिया करणारे दक्षिण मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटल हे पश्चिम भारतातील पहिलेच हॉस्पिटल ठरले. यात शस्त्रक्रिया तंत्राच्या पहिल्या टप्प्यात थोडासा बदल करून पुढील टप्पा शस्त्रक्रियेशिवाय कॅथलॅबमध्ये करण्यात आला. हे तंत्र उपयोगात आणल्याने दुसर्‍या शस्त्रक्रियेची आवश्यकता आणि त्यातील गुंतागुंत टाळण्यात आली. गुंतागुंतीच्या आंतररचनेमुळे हृदयांतर्गत दुरुस्ती शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे तेजसवर ग्लेन शंट आणि त्यानंतर फॉन्टॅन शस्त्रक्रिया किंवा युनिव्हेंट्रिक्युलर पाथवे शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय उपलब्ध होता.

याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलमधील सल्लागार बालशल्यचिकित्सक डॉ. सुरेश जोशी यांनी सांगितले की, तेजसच्या बाबतीत पहिल्या टप्प्यातच शरीराच्या खालच्या भागाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेण्यासाठी नळी जोडण्यात आली, पण त्यातील वहनमार्ग मेम्ब्रेनचा उपयोग करून बंद करण्यात आला आणि या नळीमध्ये उपाययोजना करून डिऑक्सिजनेटेड रक्त हृदयापर्यंत पोहोचेल, अशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली,जेणेकरून फुफ्फुसामध्ये अचानक रक्ताचा प्रवाह वाढणार नाही आणि शस्त्रक्रियेचा वापर न करता दुसरा टप्पाही पार पाडता येईल.

युनिव्हेंट्रिक्युलरट पाथवेमध्ये अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या 2 रक्तवाहिन्या फुफ्फुसांपर्यंत जाणार्‍या रक्तवाहिन्यांना टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करून जोडण्यात येतात. पहिल्या टप्प्यात अशुद्ध रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीला जोडण्यात येते आणि दुसर्‍या टप्प्यात शरीराच्या खालील भागातील अशुद्ध रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी शस्त्रक्रियेने ट्युबच्या माध्यमातून फुफ्फुसाकडे जाणार्‍या रक्तवाहिनीला जोडण्यात येते. परिणामी,संपूर्ण अशुद्ध रक्त फुप्फुसामध्ये शुद्धिकरणासाठी नेण्यात येते आणि ऑक्सिजनेटेड रक्त हृदयाद्वारे शरीराला पुरवण्यात येते. ही शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येते. जेणेकरून शरीर या नव्या अभिसरण स्थितीशी जुळवून घेऊ शकेल.

तेजसवरील शस्रक्रिया दुर्मीळ
इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट डॉ. मनीष चोखंद्रे यांनी सांगितले की, भारतात अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया केल्याचे संदर्भ उपलब्ध नाहीत आणि परदेशातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वैद्यकीय केंद्रांमध्ये अशाप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येते.

First Published on: May 13, 2019 4:16 AM
Exit mobile version