रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात

राज्य सरकारने हमी भावात खरेदी केलेला तांदूळ काळ्याबाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी वज्रेश्वरी-अंबाजी रस्त्यावर 250 गोणी तांदुळ विकण्यासाठी नेत असलेला ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. राज्य सरकारने खरेदी केलेला तांदूळ गोंदिया जिल्ह्यातील मिलर्सला भरडाईसाठी देऊ केला आहे. गोंदियाचा ट्रान्सपोर्ट पास घेऊन ही गाडी हा तांदूळ वसई तालुक्यातील काळाबाजारात विकण्यासाठी जात असताना कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. महिन्यांपूर्वी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी शहापूर येथे कर्नाटक येथून बेकायदा येणारे तांदूळ पकडल्याची घटना घडली होती. त्यानंतरही आदिवासी विकास महामंडळ आणि परजिल्ह्यातील व्यापारी मिलर्स यांचे साटेलोटे तुटलेले नाही.

पालघर ते गोंदिया असे तब्बल 250 ते 300 रुपये प्रती क्विंटल वाहतूक भत्ता घेऊन हा तांदूळ उचलला जातो. मात्र गोंदिया येथे भरडाईसाठी न नेता हा तांदूळ काळ्याबाजारात इकडेच किंवा अहमदाबादमध्ये व्यापार्‍यांना विकला जात असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार आणि कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार काल हा भात पकडण्यात आला. यावेळी गोंदिया येथील मिलर्स मुकेश जैन यालाही गाडी सोबत पकडून गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घोटाळ्यात शासन खरेदी करत असलेल्या एक ते सव्वा लाख टन तांदूळ या बोगस वाहतुकीत शासनाचे 10 ते 12 कोटी रुपयांची लूट करून हा तांदूळ काळ्याबाजारात विकून अपहार केला जात असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक शेतकर्‍यांकडून हमी भावाने तांदूळ खरेदी करत असते. हा तांदूळ टेंडर प्रक्रिया करून भरडाईसाठी मिलर्सला देऊन त्याची भरडाई करून त्याचे तांदूळ रास्त भाव दुकानात पुरवठा केला जातो. हे काम देताना स्थानिक राईस मिलर्सला प्राधान्य देण्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. याप्रमाणे दोन स्थानिक मिलर्स 100 टक्के मिलिंग करण्यास तयार असल्याची हमी देणारे पत्र आदिवासी महामंडळाकडे दिले आहे. असे असताना खूप मोठ्या रक्कमेचा वाहतूक खर्च देऊन हा तांदुळ गोंदिया, भंडारा, रायगड इत्यादी ठिकाणच्या मिलर्सला देण्यात येतो. परिणामी हा खरेदी केलेला तांदुळ काळयाबाजार विकला जातो आणि मग त्या बदल्यातील तांदूळ देताना कर्नाटक किंवा आंध्रप्रदेश येथून जुना स्वस्त आणि खाण्यास पौष्टिक नसलेला तांदूळ आणून दिला जातो, अशी पद्धती उजेडात आली आहे.

First Published on: October 8, 2019 5:11 AM
Exit mobile version