इमारत प्रस्ताव विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार; रवी राजा यांचा गंभीर आरोप 

इमारत प्रस्ताव विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार; रवी राजा यांचा गंभीर आरोप 

मुंबई महापालिकेत इमारत प्रस्ताव विभागात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत आहे. इमारत प्रस्ताव विभागात पोस्टिंगसाठी १ कोटी रुपयांची बोली लागते. तसेच, इमारतीला ओसी देण्यासाठी ५० लाख रुपये ते १ कोटी रुपये उकळले जातात. फाईल सरकविण्यासाठी २५ लाख रुपये टेबलाखालून घेतले जातात, असे गंभीर आरोप पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहेत. भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये भीषण आग लागून या मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील सनराईज रुग्णालयातील ९ रुग्णांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. रवी राजा यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचत पोलखोल केली.

मुंबईत सध्या इमारतींची बेसुमार बांधकामे सुरू आहेत. मात्र, पालिकेचे भ्रष्ट इमारत विभाग व तेथील भ्रष्ट अधिकारी इमारतीच्या बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व कागदपत्रांची खातरजमा न करता परवानगी, ओसी देतात. त्यामुळेच भांडुप येथील ड्रीम्स मॉलसारख्या दुर्घटना घडतात आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जातात, असा आरोप रवी राजा यांनी केला.

पालिकेच्या इमारत प्रस्ताव, अग्निशमन दलात काही भ्रष्ट अधिकारी आहेत. इमारत प्रस्ताव विभागात पोस्टिंग हवी असल्यास ५० लाख ते एक कोटी रुपये मोजावे लागतात. एखाद्या कामाची महत्वाची फाईल मंजूर करायची असल्यास त्या फाईलवर २५ लाखा ठेवल्याशिवाय ती फाईलच पुढे सरकत नाही, असा गंभीर आरोपही रवी राजा यांनी केला. या आरोपांमुळे पालिका वर्तुळात विशेषतः अधिकारी वर्गात चर्चेला उधाण आले आहे.

First Published on: March 31, 2021 10:26 PM
Exit mobile version