ठाकूरांचा बालेकिल्ला भेदण्यासाठीच रवींद्र चव्हाण पालघरचे पालकमंत्री

ठाकूरांचा बालेकिल्ला भेदण्यासाठीच रवींद्र चव्हाण पालघरचे पालकमंत्री

लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावीत यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्हा काबिज करण्याच्यादृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यानंतर पालघरचे पालकमंत्रीपद रिक्त होते. सवरा यांची मंत्रीपदाची कारकिर्द तशी पक्षासाठी राजकीयदृष्ठ्या फायद्याची ठरली नव्हती. पालघर जिल्ह्यातील एकाही निवडणुकीत सवरा आपला ठसा उमटू शकले नव्हते. निष्क्रीयतेचा ठपका असलेल्या पालकमंत्री सवरा यांना जिल्ह्यात पक्षातूनच विरोध होता. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात सवरा यांना डच्चू दिला जाईल, असे गृहीतच धरण्यात आले होते.

सवरा यांना आदिवासी मंत्री तथा पालकमंत्रीपदावरून दूर केल्यानंतर आदिवासी बहुल जिल्ह्यात भाजपाचे स्थान डळमळीत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी लगेचच माजी आमदार विवेक पंडित यांना आदिवासी विकास योजना आढावा समितीचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जाही दिला होता. खरेतर पंडित यांना आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला होता. मात्र, त्यावेळी सवरा यांच्यासह अनेक आदिवासी नेत्यांनी त्याला विरोध केला होता. तसेच आदिवासी विकास महामंडळावर बिगर आदिवासी व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घटनाबाह्य असेल अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आढावा समितीचे अध्यक्षपद देऊन मुख्यमंत्र्यांनी पंडितांच्या माध्यमातून पालघरसह राज्यातील आदिवासी भागात राज्य सरकारच्या आदिवासींसाठी असलेल्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून भाजपाचे स्थान मजबूत करण्याचे काम केले आहे.

आता पालघर जिल्ह्यावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास मर्जीतील राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जाते. सवरा यांची प्रशासनावरही पकड नव्हती. संघटनात्मकदृष्ठ्याही सवरा सपशेल नापास झाले होते. त्यामानाने चव्हाण आक्रमक आणि रिझल्ट ओरिएन्टेट असल्याचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावीत यांच्या विजयात चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीला चव्हाण पालघरमध्ये ठाण मांडून बसले होते. पालघरवर वर्चस्व मिळवायचे असेल तर वसई विरारवरील हितेंद्र ठाकूर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा मुख्यमंत्र्यांना मानस आहे. त्यादृष्टीने पालघर लोकसभा निवडणूक रंगीत तालीम ठरली होती. त्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरल्याचे मानले जाते. पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी तीन विधानसभा ठाकूरांच्या ताब्यात आहेत. पालघरची जागा शिवसेनेकडे तर विक्रमगड आणि डहाणूची जागा भाजपाकडे आहे. आता सहाही विधानसभा युतीकडे खेचण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच चव्हाण यांच्या खांद्यावर पालघरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याचे मानले जाते.

First Published on: July 6, 2019 5:12 AM
Exit mobile version