कळंबोलीतील कॅप्टन बारवर पुन्हा छापा

कळंबोलीतील कॅप्टन बारवर पुन्हा छापा

शहराच्या जवळच असलेल्या कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर असलेल्या कॅप्टन बारवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री 2:15 वाजण्याच्या सुमारास छापा मारून चार बारबालांसह हॉटेल मालक, व्यवस्थापक, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 57 जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी रविवारी या 57 जणांना पनवेलमधील न्यायालयामध्ये हजर केले असता 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.

कळंबोली परिसरातील या कॅप्टन बारची प्रकरणे वेळोवेळी चर्चेचा विषय ठरली आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी येथील आदिवासी समाजातील एका व्यक्तीच्या घरावर कब्जा करून त्यांना दमदाटी तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी कॅप्टन बारचे प्रशांत अल्वा, शिवचंद्र शेट्टी, शिवकुमार रेड्डी यांच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होता. त्यानंतर याच कॅप्टन बारमध्ये बेकायदा, अनैतिक प्रकार होत असल्याने गुन्हे अन्वेषण विभाग – 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या पथकाने रात्रीच्या वेळेस धाडसत्र राबवून दोन महिलांना ताब्यात घेतले होते. तसेच मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईला काही कालावधी होत नाही, त्यातच 13 नोव्हेंबर 2018 रोजी वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या पथकाने 23 बारबाला, 4 गायिका आणि बार व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल केला होता.

या दरम्यान या बारमध्ये कळंबोलीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीला बार मालकाकडून मारहाण करण्यात आली होती. तसेच या बारमध्ये अनेक हाणामारी सारखे प्रकार घडले असल्यामुळे कॅप्टन बारची ओळखच वादग्रस्त कॅप्टन बार म्हणून झाली होती. त्यामुळे हा बार हद्दपार करण्याबाबत विविध सामाजिक संस्थांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची विनंती केली होती.

First Published on: September 23, 2019 2:04 AM
Exit mobile version