हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल, सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल

हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल, सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल

महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारच्या वतीने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयधून टीका करण्यात आली आहे.खरं तर हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल किंवा बिग बुल आहेत. लोकशाहीला लागलेला हा कलंकच आहे, असा निशाणा सामना अग्रलेखातून साधण्यात आला आहे.

15 गद्दार नाच्यांची भर –

राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना ‘वाय’पासून ‘झेड’पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे. देशभारत अशा ‘वाय’वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार नाच्यांची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय झेड’ करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावादेखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल –

खरं तर हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल किंवा बिग बुल आहेत. लोकशाहीला लागलेला हा कलंकच आहे. तो कलंक सुरक्षित ठेवण्यासाठी काय हा आटापिटा? या आमदारांना मुंबईत येण्याची भीती वाटते की, आपल्या कैदेत असलेले आमदार मुंबईत दाखल होताच पुन्हा उड्या मारून स्वगृही दाखल होतील अशी भीती केंद्र सरकारला वाटते? त्यामुळेच त्यांना सरकारी ‘केंद्रीय’ सुरक्षा यंत्रणेचे बंदी करण्यात आले’. असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

त्यांना भाजपची फूस –

एक मात्र नक्की की, महाराष्ट्राच्या राजकीय वगनाट्यात केंद्रांचे डफली, तुणतुणेवाले उतरले असून, राज्यातील ‘नाचे’ आमदार त्यांच्या तालावर नाचत आहेत. हे आमदार आपल्या महाराष्ट्रद्रोहाचे प्रदर्श संपूर्ण देशाला आणि जगाला करीत आहेत. आता या ‘वग’नाट्याचे सूत्रधार आणि दिग्दर्शक नेमके कोण आहेत, हे उघड झाले आहेत, केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजपाचीच या नाच्यांना फूस आहे. त्यांच्या तमाशाचा फड त्यांनीच रंगवला आणि सजावला आहे. कथा-पटकथाही भाजपानेच लिहिल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

First Published on: June 27, 2022 8:58 AM
Exit mobile version