लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी ८ जण उत्सुक

लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी ८ जण उत्सुक

सेंट जॉर्ज रुग्णालय

बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललित साळवे यांच्यावर लिंगपरिवर्तनाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांना लिंगपरिवर्तनासाठी आतापर्यंत ८ जणांनी संपर्क केला आहे. स्वत:हून कॉल करुन या आठही जणांनी लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी विचारणा केली आहे. त्यामुळे लिंगपरिवर्तन या संकल्पनेवर लोक आता हळूहळू व्यक्त होऊ लागले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

जर एखाद्या व्यक्तीला शारिरीक किंवा मानसिक बदल जाणवत असतील आणि त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करुन घेतली तर समाज स्वीकारेल का? या भावनेमुळे लोकं आयुष्यभर झुरत राहतात. पण, आता कुठेतरी हा विचार बदलला आहे. याच पार्श्वभूमीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी किंवा सल्ल्यासाठी ओपीडी म्हणजेच बाह्यरुग्ण विभाग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या ओपीडीसाठी एक टीम नेमण्यात आली आहे. या टीममध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, यूरोलॉजीस्ट, प्लास्टिक सर्जन, भूलतज्ज्ञ, आणि फिजीशियन्स  यांचा समावेश आहे. तर, पुढील आठवड्यात या ओपीडीचं उद्घाटन करण्यात येणार आहे, असं वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं आहे.

“ ललित साळवेच्या शस्त्रक्रियेनंतर आम्हांला महाराष्ट्र आणि मुंबईतून शस्त्रक्रियेसाठी, सल्ल्यासाठी फोन यायला सुरूवात झाली आहे.  आतापर्यंत ८ जणांनी शस्त्रक्रियेसाठीची विचारणा केली आहे. ८ जणांची टीम या स्पेशल वॉर्डसाठी नेमण्यात आली आहे. ही ओपीडी फक्त मंगळवारची असणार आहे. या ओपीडीसाठी अजून कसलाही खर्च आलेला नाही. शिवाय, ललितलादेखील या ओपीडीच्या उद्घाटनासाठी बोलावण्याचा विचार आहे. डॉ.रजत कपूर यांची टीम या ओपीडीसाठी सज्ज आहे.  ”

डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

सीटीस्कॅन विभागाचं लवकरच उद्घाटन –

सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच सीटीस्कॅन विभागाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. सीटीस्कॅन विभागात सुरू झाल्यामुळे दूरहून येणाऱ्या रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे, असं मत सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

First Published on: June 19, 2018 7:52 PM
Exit mobile version