एमकेसीएलवर मुंबई विद्यापीठाचा वरदहस्त; तक्रारी असूनही मुदतवाढ

एमकेसीएलवर मुंबई विद्यापीठाचा वरदहस्त; तक्रारी असूनही मुदतवाढ

विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची नोंदणी, विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे, ऑनलाईन हॉल तिकिट देणे, परीक्षेचे नियोजन करणे अशा अनेक कामांसाठी मुंबई विद्यापीठाकडून एमकेसीएल या कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र या कंपनीच्या भोंगळ कारभार आणि कर्मचार्‍यांच्या उद्धटपणामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालये व विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. एमकेसीएलविरोधात विद्यार्थी, महाविद्यालये, प्राध्यापकांकडून मुंबई विद्यापीठाकडे ढीगभर तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा एमकेसीएलचे कंत्राटाला दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये, प्राध्यापक यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एमकेसीएलचे कर्मचारी देतात उद्धटपणे उत्तरे 

विद्यार्थ्यांना ऑनलाईन सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एमकेसीएल या खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून त्यांच्या परीक्षेचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी एमकेसीएल या कंपनीवर सोपवण्यात आली आहे. मात्र प्रत्येक वर्षी या कंपनीच्या गोंधळाचा फटका विद्यापीठाला सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकिट न मिळणे, प्रवेश घेताना येणार्‍या तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थी व प्राध्यापकांना करावा लागत आहे. विद्यापीठाच्या विविध विभागाच्या नुकत्याच झालेल्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत एमकेसीएलने गोंधळ घातल्यामुळे विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नसतानाही विभागांना लेक्चर्स सुरू करणे भाग पाडले होते. त्याचप्रमाणे एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण शुल्क भरल्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये फक्त ५० रुपये शुल्कच भरल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका महाविद्यालय व विद्यार्थ्यांना बसत आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक समस्या आल्यास ते विद्यापीठाकडे धाव घेतात. अशावेळी त्यासंदर्भात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी एमकेसीएलकडे विचारणा केली असता त्यांची कर्मचारी उद्धटपणे उत्तरे देतात. इतकेच नव्हे तर एखाद्या समस्येबाबत वारंवार ईमेल करूनही त्याला प्रवेश प्रक्रिया संपली तरी उत्तर देत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाचे प्राध्यापक व कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

कॉलेजांकडून विद्यापीठाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी

अ‍ॅडमिशनसाठी पेमेंट लिंक सुरू न होणे, शुल्काची माहिती एमकेसीएलच्या पोर्टलवर न दिसणे, इनवर्ड लिस्टवर क्लिक न होणे, पेमेंट न भरलेले दाखवणे, पोर्टलवर महाविद्यालयांमधील विषयांची माहिती न दिसणे, अ‍ॅडमिशनचा लॉगिनचा पासवर्ड वारंवार चुकीचे दाखवणे, नोंदणी करण्यामध्ये समस्या अशा अनेक समस्या मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या साठे कॉलेज, अंजुमन इस्लाम कॉलेज, के.सी. कॉलेज, ठाकूर कॉलेज, बिर्ला कॉलेज, विद्यापीठाचे इतिहास विभाग, फिलॉसोफी विभाग, तलासरी कॉलेज अशा अनेक कॉलेजांकडून विद्यापीठाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करत मुंबई विद्यापीठाने पुन्हा दोन वर्षांसाठी एमकेसीएलचे कंत्राट दोन वर्षांसाठी वाढवले आहे. त्यामुळे वादग्रस्त असलेल्या एमकेसीएल कंपनीला पुन्हा कंत्राट का देण्यात आले असा प्रश्न मुंबई विद्यापीठातील त्रस्त कर्मचारी व अधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठाने स्वत:ची प्रणाली विकसित करावी

मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, नॅनो टेक्नोलॉजीचे समीर कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख असे एकापेक्षा एक आयटी तज्ज्ञ मुंबई विद्यापीठाकडे आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने स्वत:ची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याऐवजी खासगी कंपनीला कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी करत आहे. खासगी कंपनीकडून विद्यार्थ्यांचा डेटा अन्य खासगी विद्यापीठाला दिला जाण्याची शक्यता असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी सांगितले.

खासगी कंपनी समाधानकारक काम देत नसल्याने तिला मुदतवाढ देण्याचे नेमके कारण काय? मुंबई विद्यापीठाने आपला दर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्वत:ची स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करून त्यासाठी डेटा सेंटर उभारणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडे सॉफ्टवेअर तज्ज्ञ असताना स्वत:चे सॉफ्टवेअर विद्यापीठ विकसित करू शकत नाही, हे लज्जास्पद आहे.
– डॉ. सुप्रिया करंडे, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
First Published on: January 20, 2021 8:36 PM
Exit mobile version