मंदीचा फटका लालबागच्या राजालाही

मंदीचा फटका लालबागच्या राजालाही

आर्थिक मंदीचा फटका अनेक उद्योगधंद्यांना बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळांचा सामना करावा लागत असताना या आर्थिक मंदीचा फटका यंदा गणेशोत्सवालाही बसला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांना याचा फटका बसला आहे. लालबागच्या राजाला अर्पण केलेली रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांतही घट झालेली पाहायला मिळाली. मंदीबरोबरच मुसळधार पाऊस हेही या परिस्थितीचे एक कारण असू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवादरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी सर्वच मंडपांमध्ये भाविकांची गर्दी कमी दिसून येत होती. परंतु त्यामुळे गणेशोत्सवामध्ये करण्यात आलेला खर्च भागवण्यासाठी दानपेटीमधून किती रक्कम मिळेल याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातच आर्थिक मंदीचा फटकाही गणेशोत्सव मंडळांना बसल्याचे चित्र सध्या आहे. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या दानाची नुकतीच मोजणी व लिलाव करण्यात आला. यामध्ये लालबागच्या राजाच्या चरणी 5.05 कोटी इतकी रक्कम मिळाली. मात्र गतवर्षी ही रक्कम 6.55 कोटी इतकी होती, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी गणेशभक्तांनी ५ किलो सोने आणि ८० किलो चांदी अर्पण केली होती. या वर्षी ३.७५ किलो सोने आणि ५६.७ किलो इतकीच चांदी अर्पण करण्यात आली आहे. ही घट पावसामुळे आणि मंदीमुळे झाली असावी असे साळवी यांचे म्हणणे आहे.

भक्तांच्या संख्येत मात्र वाढ
लालबागच्या राजाच्या दानामध्ये यंदा घट झाली असली तरी भक्तांच्या संख्येत वाढच झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गतवर्षी मंडळाने १.६२ लाख लाडू विकले होते, यंदा मात्र १.८६ लाख लाडूंची विक्री झाली. या वर्षी सर्वात महागडी भेटवस्तू सोन्याचे ताट आणि वाटी होती. या वस्तूंची किंमत १.८६ लाख रुपये असल्याचे साळवी यांनी सांगितले. यंदा १ किलो वजनाचा सोन्याचा पट्टाही मिळाला आहे. शिवाय या वस्तूंमध्ये सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या पावलांचाही समावेश आहे.

First Published on: September 19, 2019 1:29 AM
Exit mobile version