मूळ जागेवरच होणार माहुलवासीयांचे पुनर्वसन

मूळ जागेवरच होणार माहुलवासीयांचे पुनर्वसन

Prakash Maheta Meeting

प्रतिनिधी:-प्रदूषणामुळे त्रस्त झाल्याने राहण्यायोग्य ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे, यासाठी 16 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या माहुलवासीयांच्या लढ्याला अखेर सोमवारी यश आले. माहुलवासीयांचे विद्याविहारमधील तानसा जलवाहिनी शेजारी म्हणजेच मूळ जागेवरच पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु सध्या कुर्ला येथील एचडीआयच्या इमारतीमध्ये त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

माहुल येथील प्रदूषणामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विविध आजाराची लागण झाली होती. यामध्ये श्वसनाचे आजार, त्वचा रोग, लकवा, हृदयविकार अशा आजाराने ते त्रस्त झाले होते. त्यातच नवजात बालकांना जन्मजात फुफ्फुस व हृदयाचे विकार होऊ लागल्याने 16 दिवसांपूर्वी माहुलमधील नागरिकांनी आमचे राहण्यायोग्य जागेवर पुनर्वसन करावे यासाठी आंदोलन पुकारले होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे पत्रव्यवहार केला. विद्याविहारचे स्थानिक आमदार असल्याने नागरिकांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु प्रकाश महेता यांनी माहुलवासीयांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महेता यांच्या कार्यालयाला माहुलवासीयांनी घेराव घातला. परंतु त्यानंतरही त्यांनी माहुलवासीयांकडे दुर्लक्ष केले. अखेर संतापलेल्या माहुलमधील तीन हजार नागरिकांनी रविवारी महेता यांच्या घराला घेराव घालत आंदोलन केले. यावेळी महेता यांनी आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शवली. त्यानुसार सोमवारी दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये प्रकाश महेता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी माहुलवासीयांचे शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मेधा पाटकर, बिलाल खान, रेखा घाडगे, अनिता ढोले, नंदू शिंदे यांचा समावेश होता.

चर्चेदरम्यान विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीजवळच माहुलवासीयांचे पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार असल्याचे आंदोलकांना सांगण्यात आले. परंतु सध्याची परिस्थिती पाहता कुर्ल्यात कोहिनूर हॉस्पिटलजवळ एचडीआयएलने बांधलेल्या संक्रमण शिबिरात पाच हजारांहून अधिक घरे रिकामी आहेत. यापैकी काही घरे माहुलवासीयांना तात्पुरती उपलब्ध करून देऊ, मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती ‘घर बचाओ, घर बनाओ’ समितीचे बिलाल खान यांनी दिली.

आंदोलन कायम ठेवणार

सरकारने कुर्ला येथे स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत आम्हाला घरांचा ताबा दिला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन कायम राहणार असल्याची माहिती बिलाल खान यांनी दिली.

First Published on: November 13, 2018 3:19 AM
Exit mobile version