सेल्फ फायनान्स कॉलेजांना लगाम लावा – राज्यमंत्री वायकर

सेल्फ फायनान्स कॉलेजांना लगाम लावा – राज्यमंत्री वायकर

कॉलेज विद्यार्थी

मुंबई : मुंबईसह राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांना सेल्फ फायनान्सचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर अनेक कॉलेजांकडून सरार्सपणे अवाढव्य फी आकारणी केली जात आहेत. या फीमध्ये वाढ करत असताना एकाच अभ्यासक्रमाची वेगवेगळ्या कॉलेजांमधील फी मात्र वेगवेगळी आहे, असा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

कॉलेजांच्या या मनमानी कारभाराने आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्रीच हैराण झाले असून यात दुरुस्ती करण्यासाठी आता राज्यमंत्री रविंद्र वायकरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. या कॉलेजांनी मनमानीपणे फी वाढ करु नये, यासाठी त्यांच्याकडून नोंदणीकृती प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची मागणी यानिमित्ताने राज्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसह वायकर यांनी राज्यपालांकडे देखील निवेदन दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे. शासनाकडून रितसर परवानगी मिळताच या संस्था स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारत असल्याच्या तक्रारी सातत्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. विविध वर्तमानपत्रांतूनही यासंबंधीच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होताना दिसून येतात. परंतु, अशा संस्थांना स्वयं अर्थसहाय्यतेचा दर्जा देताना घालण्यात आलेल्या अटींमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास येत असल्याने यात सुधारणा करण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी कुलपती तसेच मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात काही शिफारशी केल्या आहेत.

राजकीय चर्चेला उधाण

दरम्यान, रविंद्र वायकर यांच्या पत्रानंतर राजकीय चर्चेला देखील उधाण आले आहे. वायकर यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या कारभार आहे. त्यामुळे त्यांनीच याप्रकरणी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी याप्रकरणी पावले उचलण्याची गरज असताना ते मुख्यमंत्री दरबारी गेल्याने मंत्रालयात नवी चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: September 19, 2018 1:45 AM
Exit mobile version