Banganga Lake : बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन आणि परिसराचा सर्वांगीण विकास

Banganga Lake : बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन आणि परिसराचा सर्वांगीण विकास

मुंबई : मुंबई शहर हे ऐतिहासिक, पुरातन वास्तू, किल्ले, धार्मिक स्थळे असलेले आणि पर्यटन घडविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात मलबार हील, वाळकेश्र्वर परिसरात अकराव्या शतकातील पुरातन असे ‘बाणगंगा’ हे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. मुंबई महापालिका तब्बल १६ कोटी रुपये खर्चून ‘बाणगंगा’ क्षेत्र व तेथील तलावाचे पुनरुज्जीवन आणि सर्वांगीण विकास तीन टप्प्यात करणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी ६ कोटींचा निधी वापरण्यात येत आहे. ‘बाणगंगा ‘ विकास प्रकल्पाच्या अंतर्गत येथील तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे, मत्स्य संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण, दगडी पायऱ्या, १६ दीपस्तंभ व नजीकच्या रस्त्यांची दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच, बाणगंगा तलाव येथून ते जवळच्या समुद्रापर्यंत मार्ग साकारण्यात येणार आहे. (Rejuvenation of Banganga Lake and overall development of the area)

‘बाणगंगा’ विकास कामात अडथळा ठरणारी तलाव परिसरातील १३ अतिक्रमणे हटविण्यात आली असून त्यांचे जवळच एसआरए योजनेच्या अंतर्गत पुनर्वसन करण्यात आले आहे. एकूण ११६ बांधकामे, घरे हटविण्यात येत असून त्यांचे नजीकच्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिका, जीएसबी ट्रस्ट आणि एसआरए यांनी संयुक्तपणे कामगिरी बजावली आहे. परिणामी मुंबई महापालिकेचे पुनर्वसन कामात होणारे अंदाजे ११६ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

‘बाणगंगा’ विकास प्रकल्प राबविण्यात येत असताना काही महिन्यांपूर्वीच कामाला सुरुवात करण्यात आली असून, या क्षेत्राचे धार्मिक पावित्र्य जपले जाणार आहे. पुढील वर्षभरात सदर कामे तीन टप्प्यात पूर्ण झाल्यावर ‘बाणगंगा’ धार्मिक व पर्यटन क्षेत्राचे अवघे रुपडे पालटलेले असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देवून या स्थळाचा मनमुराद आनंद लुटतील आणि धार्मिक विधी निर्विघ्नपणे पार पाडतील, असा विश्वास ‘ डी ‘ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, साहाय्यक अभियंते मनोज जेवूरकर व संजय पोळ आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे विश्वस्त ऋत्विक औरंगाबादकर यांनी दिली.

‘बाणगंगा ‘तलावातील दगडी पायऱ्यांची दुरुस्ती व सुधारणा, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी ‘मिसिंग लिंक’ विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे, अशा प्रमुख कामांना प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांनी दिली.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये बाणगंगा तलाव महाराष्ट्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या तलावाभोवती अनेक मंदिरे आहेत. तसेच, काहींच्या समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदीर, सिद्धेश्वर शंकर मंदीर, राम मंदीर, बजरंग आखाडा, वाळूकेश्वर मंदीर इत्यादी प्रसिद्ध मंदिरे आहेत. पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या तलावाचे प्राचीनकालीन महत्व लक्षात घेता देशविदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देतात.

बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्राचीनकालीन महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी बाणगंगा तलाव (वाळकेश्वर, मलबार हिल) परिसर क्षेत्रास ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले आहे. बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण सोयी-सुविधा विकास करण्याची टप्पेनिहाय कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भांमध्ये या तलावाच्या पाऊलखुणा आढळून येतात. या भागात विविध देवीदेवतांची मंदिरे, रामकुंड आदी धार्मिक स्थळेही आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठपुराव्याने या भागात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी पुरातत्व विभाग आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. त्यानुसार, संपूर्ण परिसराचा विकास करण्याची कामे सुरू आहेत.

बाणगंगा तलावालगत असलेल्या १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करताना तपुरातन दीप स्तंभाला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्यांचे तत्कालीन रूप आहे त्या स्थितीतच दिसावे, या अनुषंगाने त्याकाळी वापरण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा समावेश आहे. तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने गाळ काढला जात आहे, अशी माहितीही साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

तीन टप्प्यात होणार पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण

बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाची कामे तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुर्नउभारणी, आकर्षक विद्युत रोषणाई तलावाच्या सभोवती असलेला वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी ‘मिसिंग लिंक’ विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यावरील अतिक्रमण हटविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचे दर्शनी भाग एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतींच्या भिंतींवर भित्तिचित्रे चितारणे व शिल्पे घडविणे, रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करुन योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे आणि बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनविणे व सदर जागेत असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून त्याठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, सार्वजनिक जागा निर्माण करणे, डॉ. भगवानलाल इंद्रजीत मार्गाचे रुंदीकरण करणे व रस्ता रेषेत बाधित निवासी-अनिवासी बांधकामांचे पुनर्वसन आदी कामे केली जाणार आहेत.

श्राद्धविधीची जागा तलावाऐवजी रामकुंडाच्या ठिकाणी

अनेकजण बाणगंगा येथे धार्मिक विधी अंतर्गत श्राद्धविधीही करतात. त्यामुळे तलावात येणारे नैसर्गिक झऱ्याचे पाणी खराब होते. कधी कधी तलावातील मासे मृत पावतात. त्यामुळे आता तलावातील गाळ काढून पाणी शुद्ध केले जात आहे. पाण्यातील एक ते दीड मिटर लांबीपर्यंतच्या सर्व माशांचे जीवन जोपासले जात आहे. तलावाची खोली वाढविणार, पाण्यात ऑक्सीजन सोडणार, पाण्याची गुणवत्ता वाढविणार आणि पाण्यात धार्मिक विधिमुळे होणारे प्रदुषण रोखण्यात येणार आहे. तलावाच्या ठिकाणी होणारे धार्मिक विधी, श्राद्धविधी यापुढे ‘रामकुंड ‘ ,येथे पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा – Mumbai High Tide : यंदाच्या पावसाळ्यात 22 वेळा उंच लाटा उसळणार; सतर्कतेचा इशारा

Edited By – Vaibhav Patil

First Published on: May 1, 2024 8:32 PM
Exit mobile version