नातेवाईक क्वारंटाईनमध्ये अडकल्याने अथवा पुढे येत नसल्याने रुग्णालयांत मृतदेह पडूनच!

नातेवाईक क्वारंटाईनमध्ये अडकल्याने अथवा पुढे येत नसल्याने रुग्णालयांत मृतदेह पडूनच!

कोरोना

मुंबईतील रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पडून असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे महापालिकेची मोठी बदनामी होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देवून क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा  रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्यांना अंत्यसंस्कारासाठी जाण्यास सुट दिली जावी, अशी मागणी केली आहे. तसेच जे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नसतील तर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट नातेवाईकांच्या संमतीने महापालिकेने स्वत:च लावावी, अशी सूचना केली आहे.

मुंबईत कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांची संख्या आता ३५ हजारांच्या घरात गेली आहे. तर आतापर्यंत ११००च्यावर मृतांचा आकडा पोहोचलेला आहे मुंबईत मृत्यूचे प्रमाण वाढत असून प्रत्येक रुग्णालयात खाटांवर तसेच स्ट्रेचर्सवर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेले व्हिडीओ आता व्हायरल होवू लागले आहेत. त्यामुळे एकप्रकारची भीती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशाप्रकारे रुग्णालयात मृतदेह का पडून राहत आहेत याची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करत विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत.

विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बऱ्याच वेळा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास आणि त्यांना विविध प्रकारचे आजार असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते आणि त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे बऱ्याच प्रकरणात आई-वडिल किंवा अन्य व्यक्तीचे निधन झाल्याची बातमी कळाल्यानंतर मुलांना किंवा त्यांच्या आप्तस्वकीयांना क्वारंटाईनमध्ये असल्याने बाहेर पडता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे सोपस्कार होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास दिवस उजाडतो. अशा प्रकरणांत ज्या व्यक्तीचे रुग्णालयात निधन होईल, त्यांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कार करण्यासाठी त्वरीत क्वारंटाईनमधून मुक्त करावे आणि हे सर्व सोपस्कार केल्यानंतर त्या व्यक्ती पुन्हा क्वारंटाईनमध्ये जातील, याची खबरदारी घेतली जावी.

तर बऱ्याच प्रकरणांमध्ये आपल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या रुग्णालयाने दिल्यानंतरही आपल्यालाही कोरोनाची बाधा होईल या भीतीने त्या मृताचे आप्तस्वकीय किंवा नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीत ज्या क्वारंटाईनमध्ये त्यांच्या नातेवाईकांना ठेवले आहे, त्यांच्याकडून लेखी स्वरुपात लिहून घेत महापालिकेने त्या मृतदेहावर अंतिम संस्कार करत विल्हेवाट लावावी. जेणेकरून मृतदेह रुग्णालयात पडून राहणार नाही.

शववाहिनीअभावीही मृतदेह पडून

तर काही प्रकरणांमध्ये आपल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक त्वरीत रुग्णालयात दाखल होतात. परंतु मृतदेह नेण्यासाठी शववाहिनीच वेळेवर उपलब्ध होत नाही. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर शववाहिनी आल्यानंतर ते शव उचलले जाते. तोपर्यंत दहा ते बारा तास उलटून गेलेले असतात. तसेच काही रुग्णालयात शव वाहून नेण्यास वॉर्डबॉय तथा कामगार नसल्याने नातेवाईक मृतदेहाला हात लावण्यास तयार नसतात. त्यामुळे या प्रकरणांची दखल घेत शववाहिनी त्वरीत कशाप्रकारे उपलब्ध होईल तसेच नातेवाईक तयार असल्यास त्यांच्यासाठी पीपीई किटसह मास्क आदींची व्यवस्था करणे योग्य ठरेल, असे राजा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यासर्व सुचनांचा विचार प्रशासनाने करावा, असे नमुद केले आहे.

First Published on: May 29, 2020 9:15 PM
Exit mobile version