मृत्यूच्या प्रमाणपत्रामुळे मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी ताटकळले!

मृत्यूच्या प्रमाणपत्रामुळे मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी ताटकळले!

मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्युचे प्रमाणपत्र देण्यात येत नसताना मृतदेहाला घरात झाकून ठेवत नातलगांना मृत्युचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हा प्रकार ठाणे महानगर पालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी मुंबई महानगर पालिकेत महासभेच्या पार्श्वभूमीवर डोक्यावर कफन बांधून आंदोलन केले.

मृत्यू झाल्यानंतर प्रमाणपत्रच मिळेना!

ठाणे महानगर पालिकेची महासभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या महासभेला सुरुवात होण्यापूर्वीच शानू पठाण यांनी हे आंदोलन केले. मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो, अशा लोकांनाही मृत्यूचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागते. काही वेळा तर हजारो रुपये मोजून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते.

‘महापौरांनी तात्काळ निर्णय घ्यावा’

सोमवारी मुंब्रा येथे खालीमाबी नामक एका वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र, तिला मृत्युचा दाखल न देण्यात आल्याने तिचा मृतदेह घरामध्ये तसाच ठेवण्यात आला आहे. तर, १२ जानेवारी रोजी विनोद गुप्ता या तरुणाचा मृत्यु झाला होता. मात्र, त्याच्यावर देखील रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते. येथील डॉक्टर आपण उपचार केले नसल्याने प्रमाणपत्र देऊ शकत नाही, असे सांगत आहेत. मात्र, मुंबईमध्ये उपचार घेणारा माणूस जर मुंब्रा येथे दगावला, तर त्यास प्रमाणपत्र कसे मिळणार? त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांनी तत्काळ निर्णय घेऊन शिवाजी रुग्णालयातील ८ पैकी एका डॉक्टरची मुंब्रा येथे नियुक्ती करुन मृत्युचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी डोक्याला कफन बांधून आंदोलन केले असल्याचे शानू पठाण यांनी सांगितले.

First Published on: January 20, 2020 9:03 PM
Exit mobile version