ती जबाबदारी राज्य सरकारची, रेल्वेची नाही

ती जबाबदारी राज्य सरकारची, रेल्वेची नाही

मुंबई:-रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिकेच्या अभावी रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह पोलीस आणि प्रशासन टेम्पो आणि लोकलमधून घेऊन जात असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्यावेळी सर्वस्तरांतून मध्य रेल्वेवर चांगलीच टीका झाली. मात्र, मध्य रेल्वेकडून यावर मौन बाळगण्यात आले होते. आता मात्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के शर्मा यांनी या रेल्वे स्थानकांवरील रुग्णवाहिकांची जबाबदारी मध्य रेल्वेची नसून ती राज्य सरकारची आहे असे वक्तव्य करत हात झटकले आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवलीदरम्यान कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरसारख्या स्थानकांमध्ये अपघातात जखमी तसेच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा नसल्याने त्यांचे अतिशय हाल होत आहेत. मागील महिन्यात दिवा-आगासन मार्गावर मृत्युमुखी पडलेल्या एका प्रवाशाला चक्क टेम्पोतून स्थानकापर्यंत न्यावे लागले होते. तर नुकतेच कोकणकन्या एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू पावलेल्या एका प्रवाशाचा मृतदेह दिवा-ठाणे लोकलमधून रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यामुळे सर्वच स्तरांतून मध्य रेल्वेच्या प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली. यासंबंधित दैनिक आपलं महानगर ने वृत्त प्रकाशित केले होते.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिकेची सोय करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मध्य रेल्वेची नाही,असे शर्मा म्हणाले. अपघातातील जखमींना रुग्णालयात गोल्ड अवर्समध्ये उपचार देण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर डॉक्टर आणि मेडिकल उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न मध्य रेल्वेचा असल्याचेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेकडून या रुग्णवाहिकांच्या बाबतीत वेळोवेळी राज्य सरकारसह पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, यावर राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नाही. आज सीएसएमटी, सँडहर्स्ट रोड, भायखळा, परेल, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, कल्याण, रे रोड, वाडाला, मानखुर्द आणि वाशी इथे राज्य सरकारच्या रुग्णवाहिका आहेत. मात्र, उर्वरित रेल्वे स्थानकांवर अद्यापही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अपघातात जखमीला गोल्डन अवर्समध्ये उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होत असल्याचे चित्र सध्या आहे.

रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिकांची सोय करून देणे ही राज्य सरकारची जवाबदारी आहे. मध्य रेल्वेची नाही. फक्त रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिकांसाठी पार्किंग सुविधा, डॉक्टर आणि औषधांची सोय करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
-डी.के शर्मा , महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

First Published on: October 25, 2018 12:44 AM
Exit mobile version