दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबरला

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबरला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबरला दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण पाहता येतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२१ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) ची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान झाली होती. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आऊट काढून घेता येणार आहे. निकालानंतर दुसर्‍या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इयत्ता १० वी साठी (http://verification.mh-ssc.ac.in) व इयत्ता १२ वीसाठी (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध केली आहे. गुणपडताळणीसाठी २१ ते ३० ऑक्टोबरपर्यंत व छायाप्रतीसाठी २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.

First Published on: October 19, 2021 7:50 PM
Exit mobile version