सर्व मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्याची मुभा; वाचा राज्य सरकारचे वेळापत्रक

सर्व मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्याची मुभा; वाचा राज्य सरकारचे वेळापत्रक

येत्या काही दिवसांत लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल - मुख्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेली लोकल सेवा आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरु होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. सर्वांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, असे पत्र राज्य सरकारच्यावतीने रेल्वेला पाठविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच महिला, वकील, डबेवाले आणि खासगी सुरक्षा रक्षक यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सरसकट सर्वच मुंबईकरांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशी संघटना आणि सर्वसामान्य मुंबईकरांकडून व्यक्त होत होती.

महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून रेल्वे प्रवासासाठी राज्य सरकारने थेट परवानगी दिल्यानंतर गोंधळ उडाला होता. मागचा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने यावेली रितसर रेल्वेला पत्र लिहून कोरोनासंबंधीचे नियम पाळून लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी विनंती केली आहे.

राज्य सरकारच्यावतीने दिलेल्या पत्रात टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरु करण्याचा विचार मांडलेला आहे. यासाठी ठराविक वेळादेखील निश्चित करुन देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे सर्वसामान्य तिकीट किंवा पासधारक प्रवाशी ७.३० वाजता पहिली लोकल पकडू शकतील. तसेच दुपारी ११ ते ४.३० दरम्यानही प्रवास करु शकतील. त्यानंतर संध्याकाळी ८ ते रात्री शेवटची लोकल असेपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असेल.

तर अत्यावश्यक सेवेतील क्युआर कोडधारक ज्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र आणि रेल्वेचे तिकीट आहे, असे प्रवाशी सकाळी ८ ते १०.३० वाजेपर्यंत प्रवास करु शकतात. तर पुन्हा दुपारी ५ ते सायकांळी ७.३० दरम्यान प्रवास करु शकतात. महिलांसाठी दर तासाला विशेष महिला लोकल सोडावी, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे.

 

First Published on: October 28, 2020 6:38 PM
Exit mobile version