उल्हासनगरात कोरोना पॉझिटिव्हची वाढती आकडेवारी

उल्हासनगरात कोरोना पॉझिटिव्हची वाढती आकडेवारी

उल्हासनगरात अवघ्या तीन दिवसात ३१ पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. या रुग्णांशी संबंधित २०३ जणांचे स्वॅब कलेक्शन घेण्यात आले असून ते पाहता पॉझिटिव्हच्या आकडेवारीत वाढ होण्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. दोघांचा मृत्यू पश्चात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून पॉझिटिव्ह असल्याने उपचारा दरम्यान एका इसमाचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या तीन झाली आहे.

तीन दिवसांपूर्वी कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेचे ११ नातलग पॉझिटिव्ह निघाले आहेत. वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत उल्हासनगरच्या ब्राम्हणपाडा सानप चाळ भागात राहणारा पोलीस व त्याच्या घरातील चार जण पॉझिटिव्ह निघाल्यावर आज त्यांचे निकटवर्तीय ७ जण देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सर्वाधिक रुग्णांची संख्या असलेला सम्राट अशोक नगर व ब्राह्मणपाडा परिसर हॉटस्पॉट जाहिर केला असून मेडिकल वगळता या दोन्ही परिसराला पुर्णतः लॉकडाऊन केले आहे. अंबिका मित्र मंडळा जवळील पोलीस, मुकुंद नगर लाईनी मधील पोलीस व आणखीन दोन, प्रसूती झालेल्या महिलेचा भाऊजी, आदर्श नगरातील दुकानदार, श्रीराम नगरातील बेस्ट कर्मचारी व त्याचे वडील (उपचारा दरम्यान मृत्यू), स्टेशन जवळील ८ वर्षीय मुलगी असे ३१ रुग्ण दोन दिवसात वाढले आहेत.

शून्यावरून पॉझिटिव्हची ४९ संख्या ही अति धोक्याची घंटा असून घरातून पाय बाहेर काढणं सोडले नाही तर स्वतःला क्वारंटाईन कोविडमध्ये दाखल करण्याची परिवाराला संकटात टाकण्याची नामुष्की ओढावू शकते असा सज्जड इशारा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.
कोविड-१९ मध्ये उल्हासनगर-३६, अंबरनाथ-१, केडीएमसी-३ व बदलापूर -८ असे ४८ रुग्ण अँडमिट असल्याची माहिती अधीक्षक डॉ.भावना तेलंग यांनी दिली.

First Published on: May 11, 2020 10:21 PM
Exit mobile version