शहापूर अघई -तानसा पुलावर अपघातांचा धोका

शहापूर अघई -तानसा पुलावर अपघातांचा धोका

शहापूर-अघई या मार्गावरील पाईपलाईनलगत मोहीली गावाजवळील व टहारपूर येथील पूल जीर्ण झाले असून या दोन्ही अरुंद पुलाचे संरक्षक पाईप तुटल्याने पूल धोकादायक झाले आहेत. या पुलांवरून वाहने खाली पडून अपघात होण्याची भीती आहे .

मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील तानसा धरणाकडील मार्गाकडे जाणारा हा रस्ता प्रचंड वळणावळणाचा व अरुंद आहे. त्यातच मोहीली भावसे गावाजवळील झीरो फोर पाईपलाईन या ठिकाणी असलेला तसेच टहारपूर येथील पूल असे दोन्ही पुलाचे बांधकाम कमकुवत झाले आहे. पुलाच्या स्लॅबला तडे गेले आहेत. जीर्ण झालेले हे दोन्ही पूल आता अखेरच्या घटका मोजत असून ते कधीही कोसळतील अशा स्थितीत आहेत. या मार्गावर वसलेल्या शेकडो गाव पाड्यातील रहिवासी रोज शहापूर, अघई, तानसा, भिवंडी, वाडा या मार्गावर जाताना या पुलावरून प्रवास करतात.

भावसे व टहारपूर येथील दोन्ही पुलांचे स्टक्चरल ऑडीटचे काम आम्ही हाती घेणार आहोत. स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट आल्यानंतर पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येईल.
-वैजयंती राऊत, सहाय्यक अभियंता, तानसा मोडसागर, बांधकाम विभाग कापूरबावडी

टहारपूर भावसे या मार्गावरील पुलावरुन मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वाहनांची रोज रहदारी असते यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जीर्ण झालेल्या या दोन्ही पुलांची डागडुजी करणे गरजेचे आहे.
-के .के .संगारे, शहापूर तालुका अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी

First Published on: October 1, 2019 1:23 AM
Exit mobile version